गुवाहाटी : पती मेल्यावर रडली नाही म्हणून पत्नीला आसाममधील एका कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्य म्हणजे सत्र न्यायालयाचा निर्णय आसाम उच्च न्यायालयने कायम ठेवला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयात या महिलेला न्याय मिळाला आहे.
संबंधित महिलेच्या पतीला कसलाही आजार नव्हता. त्याचा आकस्मिक मृत्यू झाला. ज्या दिवशी मृत्यू झाला, त्या रात्री आरोपी महिला पतीच्या सोबतच होती. मात्र, पतीच्या मृत्यूनंतर तिनं एक टिपूसही गाळला नाही, असं साक्षीदारांनी कोर्टात सांगितलं. परिस्थितीजन्य पुराव्यांचा आधार घेत सत्र न्यायालयाने महिलेला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याविरुद्ध तिनं उच्च न्यायालायात दाद मागितली होती. उच्च न्यायालयानेही सत्र न्यायालयाचाच निकाल कायम ठेवला. अखेर तिनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर तिला निर्दोष मुक्त करण्यात आलं. केवळ परिस्थितीजन्य पुरावे आणि आरोपी रडली नाही म्हणून तिला दोषी ठरवणं योग्य नाही, असं मत खंडपीठानं नमूद केलं. न्यायमूर्ती आर. एफ. नरीमन व न्या. नवीन सिन्हा यांनी हा निकाल दिला.
अधिक वाचा : एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ