कोटा: कोरोनाकाळ आणि लॉकडाऊनमध्ये अनेक निराश आणि चिंता करण्यास भाग पाडणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. मात्र, याच काळात घडणाऱ्या काही सकारात्मक घटना सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहेत. अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. यात पोलिसांनी रुसलेल्या प्रेमी युगुलाला केवळ मनवलं नाही तर ठाण्याच्या परिसरातच त्यांचं लग्नही लावून दिलं. यानंतर पोलिसांचे आशिर्वाद घेऊन हे जोडपं आपल्या दुचाकीवरुन घरी निघालं. बँड-बाजाशिवायच या जोडप्यानं पोलीस ठाण्यात एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घातली.
ही घटना आहे राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडीमधील. मिळालेल्या माहितीनुसार, रामगंजमंडीच्या मारुती नगरमधील रहिवासी असलेली 22 वर्षीय युवती आणि मोतीलाल यांचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र, मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद होत असल्यानं तरुणी प्रियकराच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली. यावर पोलिसांनी तिची तक्रार न घेता दोघांना समजावून हे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी सोमवारी प्रियकर आणि दोघांच्याही कुटुंबीयांनी समजावलं. नंतर दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीनं ठाण्याच्या परिसरातच असलेल्या एका मंदिरात दोघांना एकत्र आणलं. दोघांनी मंदिरासमोर एकमेकांसोबत जगण्याचं वचन दिलं. यानंतर या जोडप्यानं पोलिसांसह आपल्या कुटुंबीयांचा आशिर्वाद घेतला आणि ते घराकडे रवाना झाले.
यादरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पत्रकारानं पंडितांची भूमिका निभावली आणि काही मिनिटांमध्येच हा विवाह संपन्न झाला. लग्नावेळी दोघांचे कुटुंबीयही तिथेच उपस्थित होते. पोलीस स्टाफनं या दोघांनाही शुभेच्छा दिल्या. अशा बहुतेक प्रकरणांमध्ये पोलिसांची भूमिका अनेकदा नकारात्मक ठरते. मात्र, कोटा पोलिसांनी केलेलं हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय ठरला असून सोशल मीडियामध्येही बराच शेअर झाला आहे.