नागपूर : लक्ष्मीभुवन चौकातील शेवाळकर बिल्डिंगमधील गम्स अॅण्ड बोन्स क्लिनिकमध्ये घरफोडी झाली. या क्लिनिकचे संचालन करणाऱ्या दाम्पत्याने एकमेकांविरोधात अंबाझरी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दोघांविरुद्धही घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
कौटुंबिक कलहातून उच्चशिक्षित दाम्पत्याने एकमेकांविरोधात दिलेल्या या तक्रारीने पोलिस व वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. रश्मी अमित घाडगे (वय ३६, रा. गायत्रीनगर, आयटी पार्कजवळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी डॉ. अमित विजय घाडगे (वय ४२, रा. रॉयल एडिफीस, सेन्ट्रल रेल्वे कॉलनी) यांच्याविरुद्ध तर अमित यांनी दिलेल्या तक्रारीवरून डॉ. रश्मी यांच्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. लग्नानंतर घाडगे दाम्पत्याचे खटके उडायला लागले. वाद वाढल्याने डॉ. रश्मी यांनी अजनी पोलिस स्टेशनमध्ये डॉ. अमित व त्यांच्या नातेवाइकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार दिली. त्यानंतर त्या मुलीसह माहेरी गायत्रीनगर येथे गेल्या.
घाडगे दाम्पत्याचे लक्ष्मीभुवन चौकात क्लिनिक आहे. क्लिनिकच्या चाव्या दोघांकडेही आहेत. ७ मार्चला डॉ. रश्मी या क्लिनिकमध्ये आल्या आल्या. त्यांना दातावर शस्त्रक्रिया करणारे उपकरणे तुटलेली दिसली. तसेच क्लिनिकमधील साहित्य गायब होते. डॉ. अमित व त्यांच्या नातेवाइकांनी क्लिनिकमधील पाच लाख २० हजार रुपयांचे साहित्य चोरी केल्याची तक्रार डॉ. रश्मी यांनी दिली तर, डॉ. अमित यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कान, नाक, घशाच्या क्लिनिकमधून डॉ. रश्मी यांनी सोन्याचे दागिने व दीड लाख रुपये असा एकूण चार लाख ४० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी केला. पोलिसांनी अखेर दोघांविरुद्धही घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अधिक वाचा : पावणे दोन लाखांची दारू सोडली नदीत