नागपूर : कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे असलेला कापूस राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १५ केंद्रांवर खरेदी करण्यात येत असून येत्या १५ ते २० दिवसांत शेतकऱ्यांकडील संपूर्ण कापूस खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कापूस पणन महासंघ व पीसीआयमार्फत कापसाची खरेदी जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोविड-१९ नंतर ३९ हजार ३५२ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी ३ हजार ५०४ शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी करण्यात आली आहे. अद्याप २५ हजार ६४८ शेतकऱ्यांकडून कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. कापूस खरेदी करताना नोंदणीकृत शेतकऱ्यांकडूनच कापसाची खरेदी करण्याचे निर्देश दिले असून व्यापारी अथवा बाहेरुन येणाऱ्या राज्यातील कापूस खरेदी करण्यात येऊ नये यादृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. रविवार वगळता इतर सुटीच्या दिवशी कापूस खरेदी सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे ठाकरे यांनी दिली.
कापूस खरेदीसाठी १५ जिनिंग व प्रेसिंग येथे व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक ग्रेडर कृषी विभागामार्फत नियुक्त करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादित कापूस खरेदीसाठी आणताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
Also Read- चौथ्या लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या संख्येत मोठी वाढ; २४ तासांत ६ हजार नवे रुग्ण