Coronavirus India: बालकांना लावा मास्क लावण्याची सवय

Date:

करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत जात आहे. पहिली लाट ही ज्येष्ठांसाठी घातक ठरली, तर दुसरी लाट ज्येष्ठ आणि तरुणांसाठीही धोकादायक ठरत आहे. अशात तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या १८ वर्षांवरील सर्वांसाठी लस उपलब्ध आहे. मात्र, बालकांचे लसीकरण अद्याप सुरू झालेले नाही. याबाबत विदेशामध्ये विविध संशोधने सुरू आहेत. पण, अशा स्थितीमध्ये बालकांसाठी मास्क आणि इतर सुरक्षा हेच मोठे शस्त्र आहे. लहान मुले मास्क लावत नसल्याची अनेक पालकांची तक्रार असते. दोन वर्षांवरील बालकांना समज आलेली असते. अशात ते पालकांचे अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी स्वत:सुद्धा मास्क वापरावे आणि बालकांना त्यांच्या आकाराचे मास्क देऊन त्यांनाही मास्क लावण्याची सवय लावावी, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद मंडलिक आणि डॉ. अनिल राऊत यांनी ‘कोव्हिड संवाद’मध्ये दिला.

नागपूर महापालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने सुरू करण्यात आलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात डॉ. मंडलिक आणि डॉ. राऊत यांनी ‘बालकांमधील कोव्हिड आणि लसीकरण’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केले.

लॉकडाउनमुळे मागील वर्षभरापासून लहान मुले घरात बसून आहेत. शाळा, बाहेर जाणे, मित्रांसोबत खेळणे, गप्पा मारणे हे सर्व बंद असल्याने त्यांचा बाहेर कुणाशी संपर्क येत नाही. अशा स्थितीत घरातील मोठे व्यक्ती जे कामानिमित्त वा इतर कारणानिमित्त घराबाहेर जातात व पुन्हा घरात परत येतात त्यांच्याशीच त्यांचा संपर्क येतो. घराबाहेर गेलेली एखादी व्यक्ती करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास बालकांनासुद्धा करोना होऊ शकतो. मात्र, बालकांमध्ये करोनाचे गंभीर लक्षण आढळत नसले तरी ते ‘सुपर स्प्रेडर’ ठरू शकतात. घरातील ज्येष्ठांनाही त्यांच्यामुळे बाधा होऊ शकते. अशा स्थितीत घरातील सर्व मोठ्या व्यक्तींनी सुरक्षेची सर्व काळजी घेणे आवश्यक आहे. बाहेरून आल्यानंतर आधी साबण व पाण्याने हात धुवावे, मास्क लावल्यानंतरच बाळाच्या जवळ जावे, असा सल्लाही डॉ. मंडलिक व डॉ. राऊत यांनी दिला.

आई आणि वडील करोना पॉझिटिव्ह असणे व बाळाचा अहवाल निगेटिव्ह असणे किंवा बाळ पॉझिटिव्ह व आई-वडील निगेटिव्ह असणे, असे अनेकदा घडते. अशा स्थितीत बाळाला एकटे ठेवणे शक्य नसते. यावेळी पालक मुलांना थेट आजी-आजोबांकडे सोपवतात. मात्र, इथेच धोका निर्माण होऊ शकतो. बाळ पॉझिटिव्ह असेल व आई निगेटिव्ह असेल, तर त्याची काळजी घेण्यासाठी आईने सोबत रहावे. किंवा बाळ निगेटिव्ह आणि आई-वडील पॉझिटिव्ह असतील तरीसुद्धा बाळाला सोबत ठेवावे. बाळाला स्तनपान करताना आईने मास्क लावावे, स्तनपानानंतर बाळाला स्वत:पासून दूर ठेवावे. स्तनपानामुळे बाळाला करोना संसर्ग होत नाही. तसेच गर्भवती महिला करोनानाबाधित असेल तरीसुद्धा बाळाला करोना होत नाही. बाळाच्या आमोरासामोरच्या थेट संपर्कामुळेच करोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे मास्क हे सुरक्षेचे मोठे शस्त्र आहे. घरातील सर्व व्यक्तींनी मास्क लावून बाळांना त्याचे अनुकरण करण्यास शिकवावे. आजघडीला सुरक्षा हेच सर्वोत्तम औषध आहे. त्याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन डॉ. मंडलिक व डॉ. राऊत यांनी केले.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related