नागपूर : सलग तीन दिवस तीन मृत्यू , वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. आठ दिवसांत हा चौथा मृत्यू आहे. मृतांची संख्या सात झाली आहे. विशेष म्हणजे, मृत महिलेच्या नातेवाईकांनी माहिती लपवून ठेवल्याने एका डॉक्टरसह नऊ परिचारिका व दोन अटेन्डंटवर क्वारंटाईन होण्याची वेळ आली. आज नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ३७३ वर पोहचली आहे. समाधानाची बाब म्हणजे, आज मेडिकलमधून ४२ तर मेयोमधून तीन असे एकूण ४५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. बरे झालेल्यांची संख्या २७२ झाली आहे.
मेयोच्या अपघात विभागात सोमवारी सायंकाळी ५६ वर्षीय महिलेला दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या नातेवाईकांनी पत्ता हंसापुरी सांगितल्याने डॉक्टरांनी रुग्णावर संशय न घेता मेडिसीनच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. महिला रुग्णाला हृदयविकाराचा त्रास होता. रुग्णाची गंभीर प्रकृती पाहता तातडीने अतिदक्षता विभागात भरती केले. येथे उपचार सुरू असताना साधारण २० मिनिटात रुग्णाचा मृत्यू झाला. मृताच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले असता सोमवारी सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरसह, परिचारिका व अटेन्डंट अशा नऊ जणांना क्वारंटाईन करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाकडून मृताची अधिक माहिती घेतली असता मृत महिला कंटेन्मेंट परिसर म्हणजे मोमिनपुरा येथील रहिवासी होती. मृताच्या नातेवाईकांनी हे आधीच सांगितले असते तर आज डॉक्टर, नर्सेस व अटेन्डंटला क्वारंटाईन करण्याची गरज पडली नसल्याचे सांगितले जाते.
गड्डीगोदाम येथील पुन्हा सहा रुग्ण पॉझिटिव्ह
मोमिनपुरा व सतरंजीपुरा येथील सर्वाधिक रुग्ण दिसून येत असताना आता यात गड्डीगोदाम येथील रुग्णांची भर पडत चालली आहे. रविवारी या वसाहतीतून पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले असताना सोमवारी पुन्हा सहा रुग्ण मेयोच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आले. या वसाहतीतील आतापर्यंत १२ रुग्णांचे निदान झाले आहे. तर मोमिनपुऱ्यातील दोन रुग्ण माफसुच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आले. हे आठही रुग्ण सिम्बॉयसीस येथे क्वारंटाईन होते.
मेयोतून ३ तर मेडिकलमधून ४२ रुग्ण घरी
मेयोमधून मोमिनपुरा येथील दोन पुरुष व एका महिलेला सुटी देण्यात आली. तर मेडिकलमधून तब्बल ४२ रुग्णांना सुटी देण्यात आली. कोरोनाबाधित सुधारीत डिस्चार्ज धोरणानुसार मेडिकलने या रुग्णांना सुटी दिल्याचे सांगण्यात येते. या रुग्णांना पुढील सात दिवस सक्तीचे होम आयसोलेशन राहायचे आहे. यांच्याकडून तसे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आल्याची माहिती आहे.
सारीचा एक मृत्यू तर आठ नवे रुग्ण भरती
‘सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणजे ‘सारी’च्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. आतापर्यंत सारी व कोविड पॉझिटिव्ह आलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे या रुग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे. आज अमरावती येथून आलेल्या ७०वर्षीय महिलेचा मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या शिवाय, मेडिकलमध्ये सारीचे आठ नवे रुग्ण भरती झाले. यात तीन लहान मुलांसह चार पुरूष व एक महिला आहे. सध्या १४ रुग्ण उपचार घेत आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित २४७
दैनिक तपासणी नमुने २५९
दैनिक निगेटिव्ह नमुने २५०
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ३७३
नागपुरातील मृत्यू ७
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण २७२
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २०८६
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १,८१४
पीडित-३७३-दुरुस्त-२७२-मृत्यू-७