नागपुर : लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू आहे. काही अटी घालून शिथिलता दिली आहे. परंतु बहुसंख्य लोक अटी पाळत नसल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. मागील आठ दिवसात नागपुरात रुग्णांच्या संख्येने पहिल्यांदाच उच्चांक गाठला आहे. तब्बल ३१० रुग्णांची नोंद झाली. यात आज ५८ रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्येची हजाराकडे वाटचाल आहे. एकूण रुग्णांची संख्या ९२१ वर पोहचली आहे.
सतरंजीपुरा, मोमीनपुरा, नाईक तलाव-बांग्लादेशसह आता लष्करीबाग हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे. या वसाहतीतून १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. दोन दिवसापूर्वी लष्करीबाग येथील ५२ वर्षीय महिला मेयोत उपचारासाठी आली. या महिलेला लक्षणे असल्याने मेयोत भरती करून घेतले. दुसऱ्या दिवशी ही महिला पॉझिटिव्ह आली. यामुळे तिच्या कुटुंबासह संपर्कात आलेल्यांना पाचपावली पोलीस क्वॉर्टर येथे क्वारंटाईन करण्यात आले. यातील १३ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, ती महिला क्वारंटाईन नव्हती. ती स्वत:हून रुग्णालयात आली. यामुळे लष्करीबाग येथून रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. मध्य व पूर्व नागपुरात कोरोनाची लागण आता उत्तर नागपूरकडे जात आहे. सतरंजीपुरा, मोमीनपुरा, गोळीबार चौक, टिमकी, भानखेडा, कमाल टॉकीज चौक, नाईक तलाव-बांग्लादेश आणि आता लष्करीबाग येथे रुग्ण दिसून येत आहे. हा दाट वसाहतींचा भाग असल्याने आरोग्य यंत्रणेला पुढील काही दिवस अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहे.
नाईक तलाव १३ तर शांतिनगर येथून १० रुग्ण
नाईक तलाव-बांग्लादेश येथून बुधवारी तब्बल ६१ रुग्ण पॉझटिव्ह आले असताना आज याच वसाहतीतून १३ रुग्णांची नोंद झाली आहे. हे सर्वच रुग्ण विविध ठिकाणी क्वारंटाईन होते. या शिवाय शांतिनगर येथून १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. मोमीनपुरा येथून पाच तर हंसापुरी येथून चार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्व रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आले होते.
रेल्वे कॉलनी व भगवाघर परिसरातही रुग्ण
अजनी रेल्वे कॉलनीत पुन्हा एक रुग्ण मेयोच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला. या शिवाय गीतांजली चौक भगवाघर परिसरात पहिल्यांदाच पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. या पाचही रुग्णांना संशयित म्हणून पाचपावली पोलीस क्वॉर्टर येथे क्वारंटाईन करण्यात आले होते.
ग्रामीण भागात सहा रुग्ण पॉझिटिव्ह
शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात वाडी दाभा येथील तीन, कोरोडी तालुक्यातील एक, काटोल तालुक्यातील रिजोरा गावात एक तर हिंगणा तालुक्यातील नीलडोह येथील एक रुग्ण आहे. विशेष म्हणजे, रिजोरा व नीलडोह गावातील रुग्णाने एका खासगी प्रयोगशाळेतून नमुन तपासून घेतला असताना अहवाल पॉझिटिव्ह आला. अकोला जिल्ह्यातून नागपूरच्या मेडिकलमध्ये ‘सारी’वर उपचार घेत असलेल्या ५६ वर्षीय रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला.
मेयोतून सहा रुग्णांना सुटी
मेयोतून सहा रुग्णांन सुटी देण्यात आली. यात टिमकी येथील तीन, मोमीनपुरा येथील दोन तर एक रुग्ण प्रेमनगर येथील आहे. या रुग्णांना पुढील १४ दिवस ‘होम आयसोलेशन’मध्ये रहायचे आहे, तसे त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. बरे होऊन घरी परतलेल्यांच संख्या आता ५४९ वर पोहचली आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १३९
दैनिक तपासणी नमुने ३५८
दैनिक निगेटिव्ह नमुने ३०४
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ९२१
नागपुरातील मृत्यू १५
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ५४९
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३२९९
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २०६६
पीडित- ९२१-दुरुस्त-५४९-मृत्यू-१५
Also Read- कमी खर्चाची नवीन कोरोना विषाणू चाचणी विकसित