नागपुर : कोरोनाच्या काळातील अनलॉकचा तिसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला. परंतु नागपुरात रुग्ण व मृत्यूंची संख्या वाढतच चालली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी एका रुग्णाचा मृत्यू तर ३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील तीन रुग्ण विविध खासगी हॉस्पिटलमधील आहेत. रुग्णांची संख्या ७३९ तर मृतांची संख्या १५ झाली आहे.
हंसापुरी गोळीबार चौक येथील ४२ वर्षीय रुग्ण १ जून रोजी मेयोमध्ये दाखल झाला. २ जून रोजी या रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला होता. रुग्ण डायलिसिसवर होता. गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्याचा त्रास सुरू झाल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिन्यात चार मृत्यूची नोंद झाली आहे.
खासगी प्रयोगशाळेतून वाढताहेत रुग्ण
जिल्हांतर्गत प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. मध्यप्रदेशासह इतर जिल्ह्यातील रुग्ण नागपुरात येऊ लागले आहेत. खासगी हॉस्पिटलध्येही रुग्ण वाढू लागले आहेत. यातील रुग्णांना लक्षणे दिसताच खासगी लॅबमधून चाचणी केली जात आहे. आज खासगी लॅबमधून पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात मोमिनपुऱ्यातील गर्भवती महिला, टेकडीवाडी येथील एक रुग्ण, इंदोरा चौक जसवंत मॉल परिसरातील एक रुग्ण, टिमकी येथील एक तर छिंदवाडा येथील एक रुग्ण आहे. यातील तीन रुग्ण विविध खासगी हॉस्पिटलमधील आहेत.
अजनी क्वॉर्टरमधून आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह
सिंदी रेल्वे कार्यालयात कार्यरत असलेला एक कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची संख्या सहा झाली आहे. आज पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे रुग्ण रेल्वे कर्मचारी असून अजनी क्वॉर्टर येथील रहिवासी आहेत. या दोन्ही रुग्णांना रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
सावनेर येथे दोन तर हिंगण्यात एक रुग्ण
सावनेर शहरात पहिल्यांदाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली. वॉर्ड क्र ४ मधील हा रुग्ण मुंबर्ई येथून आला. तर सावनेर तालुक्यातील भानेगाव येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण ओडिशा येथून आला. या दोन्ही रुग्णांना मेयोत दाखल करण्यात आले. सावनेर तालुक्यात आतापर्यंत पाच रुग्णांची नोंद झाली असून ४५ संशयितांना क्वांरटाईन करण्यात आले. या शिवाय हिंगण्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. ‘सारी’ या आजाराच्या या ७२ वर्षीय रुग्णाला मेडिकलमध्ये भरती केले असता अहवाल पॉझिटिव्ह आला.
मेयोतून आठ, एम्समधून पाच तर मेडिकलमधून तीन रुग्णांना डिस्चार्ज
मेयोतून आठ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात लोकमान्य नगरातील चार, तांडापेठ येथील दोन, सदर येथील एक तर नाईक तलाव येथील एक रुग्णाचा समावेश आहे. एम्समधून पाच रुग्णांना सुटी देण्यात आली. यात हावरापेठ येथील दोन, वसंतनगर येथील दोन तर भगवाननगर येथील एक रुग्ण आहे. मेडिकलमधून तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यात गिट्टीखदान येथील दोन तर, ताजनगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. आज १६ रुग्ण रुग्णालयातून घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४९३ वर पोहचली आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ४७७
दैनिक तपासणी नमुने ६३९
दैनिक निगेटिव्ह नमुने ६३४
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ७३९
नागपुरातील मृत्यू १५
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ४९३
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३,१४९
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १,८४०
पीडित- ७३९
दुरुस्त-४९३
मृत्यू-१५
Also Read- कमीत कमी खर्चात मनपाचे नाले सफाई अभियान