नागपुर : सलग दोन दिवस रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना शुक्रवारी त्या तुलनेत निम्म्याहूनही कमी रुग्णांची नोंद झाली. आज १८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यात दोन वर्षाची चिमुकली व अडीच वर्षाचा चिमुकला आहे. रुग्णांची संख्या ९३९ वर पोहचली आहे. चंद्रमणीनगरात पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर सावित्रीबाई फुले नगर या स्लम वसाहतीत पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाला.
नागपुरात रुग्णांच्या संख्येची हजाराकडे वाटचाल असली तरी रुग्ण बरे होऊन घरी पतरणाऱ्यांची संख्या समाधानकारक आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत आतापर्यंत ६१ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. असे असताना, लॉकडाऊन शिथिलतेच्या या काळात अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञानी केले आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये सावित्रीबाई फुले नगर या स्लम वसाहतीतील अडीच वर्षाचा मुलगा आहे. प्राप्त माहितीनुसार, त्याची आई चार दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले नगर वसाहतीत आपल्या माहेरी आली होती. दोन दिवसांपूर्वी मुलाची प्रकृती खराब झाल्याने त्याला एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्याचा नमुना तपासणीसाठी पाठविला असता तो पॉझिटिव्ह आला. चिमुकल्याला झालेल्या संसर्गाचा संपर्काचा शोध घेतला जात आहे.
चंद्रमणीनगर हॉटस्पॉट होणार का?
चंद्रमणीनगर येथील २७ वर्षीय युवक ८ जून रोजी पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण स्वत:हून मेडिकलमध्ये भरती झाला होता. या रुग्णाला मोमीनपुरा येथून लागण झाल्याचे सांगण्यात येते. याच्या कुटुंबाला व संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केले असता आज ४८ वर्षीय व २५ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला. दाटीवटीने वसलेली ही वसाहत ‘हॉटस्पॉट’ तर होणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मोमीनपुरा, निकालस मंदिर, बजेरिया, नाईक तलाव येथेही रुग्ण
दोन महिन्याचा कालावधी होत असतानाही मोमीनपुरा येथून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले, बांगलादेश-नाईक तलाव येथून दोन, निकालस मंदिर, बजेरिया, टिमकी व हंसापुरी वसाहतीतही प्रत्येकी एक रुग्णाची नोंद झाली.
पाच रुग्ण ग्रामीण भागातील
ग्रामीण भागात आज पुन्हा पाच रुग्णांची नोंद झाली. यात कोराडी सिद्धार्थ नगर येथील येथील दोन वर्षाची मुलगी, सावनेर येथील एक तर काटोल येथील तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण क्वारंटाईन होते. या शिवाय, नागपुरातील एका खासगी प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यामध्ये अमरावतीमधील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.
१८ रुग्ण बरे
मेयोमधून पाच रुग्णांना सुटी देण्यात आली. यात अकोल्यातील तीन, मोमीनपुरा व भानखेडा येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. मेडिकलमधून १३ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात सात रुग्ण बांगलादेश-नाईक तलाव येथील, पाच रुग्ण मोमीनपुरा तर एक गोळीबार चौक परिसरातील आहे. असे एकूण १८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ४७४
दैनिक तपासणी नमुने २८०
दैनिक निगेटिव्ह नमुने २६४
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ९३९
नागपुरातील मृत्यू १५
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ५७३
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३३४६
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २२७४
पीडित- ९३९-दुरुस्त-५७३-मृत्यू-१५