करोना नव्या रूपात येत आहे, काळजी घेणे हाच सर्वोत्तम उपाय: योगेश कुंभेजकर

करोना नव्या रूपात येत आहे, काळजी घेणे हाच सर्वोत्तम उपाय

नागपूर : करोनाला आपण कंटाळलो असलो तरी करोना कंटाळलेला नाही. तो नव्या रूपात येत आहे. त्यामुळे मला काहीच होत नाही, असे समजणे हे संसर्गाला निमंत्रण देण्यासारखे आहे. वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. त्यामुळे स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेणे हाच त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी व्यक्त केले.त्यांनी शहर व ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयात साथ नियंत्रणासाठी आतापर्यंत केलेल्या व पुढे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबतही सांगितले.

ते म्हणाले, चाचण्यांमध्ये सकारात्मक रुग्णांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. अशा स्थितीत लोकांनी बेफिकीर राहून चालणार नाही, रोगप्रतिकार शक्ती वाढली म्हणून किंवा एकदा बाधित झालो म्हणून करोना पुन्हा होणार नाही, असे समजणे चुकीचे आहे. अनेकांना एकाहून अधिक वेळा बाधा झाली आहे. त्यामुळे काळजी घेणे हा त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. आपल्या मागे कुटुंब आहे हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आवश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडणे टाळले तरच साथ नियंत्रणात येईल.

उपाययोजनांच्या पातळीवर सरकारी यंत्रणा दिवसरात्र काम करीत आहे. चाचण्या, औषध पुरवठा, विलगीकरण केंद्र, लसीकरण, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाची जुळवाजुळव, ऑक्सिजन पुरवठा, रुग्णवाहिकेची सुविधा, कोविड केअर सेंटर यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र त्यालाही मर्यादा आहेच. करोनाबाधितांसोबतच इतर रुग्णांवरही उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठीही नियोजन केले जात आहे. रेमडिसीव्हर, अ‍ॅन्टिबॉयटिक व इतर औषधसाठा ग्रामीण भागात उपलब्ध करून दिला जात आहे. अंगणवाडी सेविका, आशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विलगीकरण केंद्रातील रुग्णांची काळजी घेत आहेत, असे कुंभेजकर म्हणाले. करोनाची पहिली लाट ओसरल्यावर यंत्रणेत ढिलाई आली, हा आरोप त्यांनी फेटाळून लावला. करोनामुळे थांबलेल्या जिल्हा परिषदेच्या इतरही कामांकडे लक्ष देणे आवश्यक होते. मुलांच्या शिक्षणासह इतरही महत्त्वाच्या कामांचा त्यात समावेश होता. स्वच्छ भारत, जल जीवन, बोअरवेलचे फ्लशिंग, जलसंधारणाची कामे सुरू करण्यात आली. जेव्हा संसर्ग वाढला तेव्हा पुन्हा नव्याने साथ नियंत्रणात यंत्रणा जुंपली, असे ते म्हणाले.

ग्रामीण भागात लसीकरण जोरात                                                                                          ग्रामीण भागात लसीकरण जोरात सुरू आहे. सध्या एकूण १५० केंद्रांवर ही सोय करण्यात आली असून साठ वर्षांवरील नागरिकांना १.२५ लाख मात्रा देण्यात आल्या. त्यापैकी १.१२ लाख लोकांनी प्रथम तर १३ लाख लोकांनी दुसरी मात्रा घेतली. ६५ टक्के ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन कुंभेजकर यांनी केले.

 

ग्रामीण उपकेंद्रात ऑक्सिजनची सोय                                                                                          ग्रामीण भागातील तीन आरोग्य उपकेंद्रात करोना रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले जात आहेत. कळमेश्वर, सावनेरसह तीन ठिकाणी कोविड केअर केंद्र सुरू केले आहे. चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे.

 

खाटांची उपलब्धता वाढणार                                                                                              मेडिकल रुग्णालयात ३०० तर हिंगण्यातील शालिनीताई मेघे रुग्णालयात ३५० अशा एकूण ६५० खाटा वाढवण्याचे नियोजन आहे. टप्प्याटप्प्याने त्या रुग्णांसाठी उपलब्ध होतील. मेडिकलमध्ये ऑक्सिजन टँकही उभारण्यात येत आहे. मेयोमध्ये ४० परिचारिकांची नियुक्ती केली आहे. डॉक्टरांची संख्याही वाढवून देण्यात येणार आहे, असे कुंभेजकर म्हणाले.