Corona: जर लक्षणे असतील वा झाला असेल; वाचा काय करावे आणि काय करु नये

Date:

कोरोना व्हायरसची दुसरी लाट सध्या देशात धुमाकूळ घालत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशात दररोज तब्बल तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य यंत्रणेवर अत्यंत मोठा ताण असून अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड्स मिळण्यात देखील अडचणी येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर जर तुम्हाला कोरोनाची लक्षणे असतील तर काही गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील तर काही जाणीवपूर्वक कटाक्षाने टाळाव्या लागतील.

A. तुम्ही कोरोनाबाधित आहात, असं वाटत असल्यास…

हे करा –

  1. स्वतंत्र वॉशरुम आणि टॉयलेटची सोय असणाऱ्या खोलीमध्ये स्वत:ला आयसोलेट करा.
  2. स्वत:ची RT-PCR चाचणी करुन घ्या.
  3. दरम्यानच्या काळात घरीच रहा. कोरोनाची लक्षणे असलेले बरेचशे रुग्ण घरीच आयसोलेट राहून देखील बरे होत आहेत. डॉक्टरांच्या संपर्कात रहा.
  4. लक्षणांमधील बदलांवर लक्ष ठेवा. जर तुम्हाला जाणवणारी लक्षणे अधिक त्रासदायक वाटू लागली, जसे की श्वासोच्छवासास त्रास होणे, तर डॉक्टरांना संपर्क साधा आणि त्वरित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हा.
  5. संपूर्ण नाक आणि तोंड झाकेल असा चांगल्या क्वॉलिटीचा मास्क वापरा. इतर मास्कपेक्षा N-95 हा चांगला आहे.
  6. शिंकताना आणि खोकताना तोंड आणि नाक रुमालाने झाका.
  7. वारंवार साबणाने हात धुवत रहा. तसेच हात सॅनिटाईज करत रहा.
  8. पाणी पित रहा, आराम करा. मसालेदार अन्न टाळून साधे आणि पचण्यास हलक्या आहाराचे सेवन करा.
  9. पल्स ऑक्सिमीटरने आपल्या ऑक्सिजनची पातळी पाहत रहा. जर तुमच्या ऑक्सिजनची पातळी 95 च्या खाली गेली असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
  10. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास पोटावर पालथे झोपा. असे केल्याने श्वास घेण्यास मदत होईल.

हे करु नका

  1. आपण वापरलेल्या वस्तू, अन्न, भांडी आणि टॉयलेट इतरांना वापरु देऊ नका.
  2. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था टाळा.
  3. आरोग्याच्या कारणांव्यतिरिक्त घराबाहेर पडणे टाळा
  4. सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा
  5. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कसल्याही प्रकारची औषधे, रेमडेसिव्हीर इत्यादी घेणे टाळा.

 

B.तुमची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यास…

हे करा –

  1. RT-PCR चाचणी झाल्यावर डॉक्टरांची भेट घेऊन सल्ला घ्या.
  2. घरी रहा
  3. तुमच्या लक्षणांवर लक्ष ठेवा. जर तुम्हाला त्रास होऊ लागला तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
  4. तुमच्या संपर्कात आलेल्यांना तुमच्या पॉझिटीव्ह असण्याबाबत कळवा.
  5. वॉशरुम आणि टॉयलेटची स्वतंत्र सुविधा असणाऱ्या खोलीत स्वत:ला आयसोलेट करा.
  6. आराम करा, चौरस आहार घ्या आणि पुरेसे पाणी प्या.
  7. कोरोनाच्या सामान्य नियमांचे पालन करा, जसे की मास्क, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाईजेशन
  8. तुम्ही ज्या वस्तुंना वारंवार स्पर्श करता त्या वस्तुंचे पृष्ठभाग सतत स्वच्छ करा. जसे की, मोबाईल, रिमोट, टॉयलेट, किबोर्ड, टॅबलेट्स इत्यादी…
  9. ऑक्सिजनची पातळी सतत पाहत रहा. 95 च्या खाली आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
  10. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास पोटावर पालथे झोपा जेणेकरुन तुम्हाला श्वास घेण्यास मदत होईल.
  11. शिंकताना अथवा खोकताना आपले नाक आणि तोंड झाका
  12. वापरलेले मास्क, टिश्यूची योग्य विल्हेवाट लावा
  13. त्यानंतर तुमचे हात साबण आणि पाण्याने जवळपास 20 सेकंद धुवा
  14. जर साबण आणि पाणी उपलब्ध नसेल तर चांगल्या क्वॉलिटीच्या सॅनिटायझरने हात स्वच्छ करा.

 

C. हे अजिबात करु नका…

  1. वैयक्तिक साहित्य इतरांसोबत वापरणे टाळा. जसे की टॉवेल, बेड, अन्न, टॉयलेट इ.
  2. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉईड्स, रेमडेसिव्हीर अशी औषधे घेऊ नका.
  3. ऑफिस, शाळा, थिएटर वा रेस्टॉरंट्स अशा सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका.
  4. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था वापरणे टाळा.

 

D.आयसोलेशनमधून कधी बाहेर येऊ शकतो…?

जर तुम्हाला कोरोना झाल्याची शंका असेल तर...

  1. जर तुम्हाला कोरोना झाल्याची शंका असेल मात्र, त्याची खात्री झाली नसेल तर कोरोनाची लक्षणे पहिल्यांदा दिसू लागल्यापासून 10 दिवस आयसोलेशनमध्ये रहा.
  2. इतर लक्षणे कमी झाल्यास आणि 24 तासांत कसल्याही प्रकारचे पॅरासिटेमॉल न घेता ताप न आल्यास आयसोलेशनमधून बाहेर येऊ शकता.
  3. वास आणि चव परत येण्यास काही आठवडेही लागू शकतात, त्यामुळे आयसोलेशनमधून बाहेर येण्यास तो निकष मानता येणार नाही.

जर तुम्ही कोरोना पॉझिटीव्ह असाल तर…

  1. जर तुम्हाला कसलीही कोरोना लक्षणे आता दिसत नसतील तर तुम्ही पॉझिटीव्ह आल्यानंतरच्या दहा दिवसांनंतर तुमचं आयोसोलेशन थांबवू शकता.
  2. जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला त्याआधी टेस्टींग करायला सांगितले असेल तर तसे करुनच आयसोलेशनमधून बाहेर या.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related