अश्लीलता, हिंसक दृश्ये आणि असभ्य संवादांचा भरमार असणाऱ्या वेबसीरिज भारतीय संस्कृती व नैतिकतेवर घाला घालणाऱ्या असून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे.
नेटफ्लिक्स, एएलटी बालाजी, युट्यूब, हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम, वूट वामियो यांसारख्या इंटरनेटवरील खासगी वाहिन्यांवरून कोणत्याही प्रकारे प्रमाणित अथवा सेन्सॉर न केलल्या वेबसीरिज प्रसारित होत आहेत. त्यामुळे समाजात व युवकांमध्ये अश्लीलता, नग्नता, व्यभिचाराचा मुक्तपणे प्रसार होत आहे, असा दावा अॅड. दिव्या गोंटिया यांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. त्यावर शुक्रवारी न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. मुरलीधर गिरटकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने केंद्रीय माहिती व प्रसाराण मंत्रालय, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फॉर्मेशन मंत्रालय, केंद्रीय गृहमंत्रालय आणि नागपूर पोलिस आयुक्तांना नोटीस बजावली असून त्यावर ३१ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे.
याचिकाकर्तीनुसार, वेबसीरिजमधील विषय राजकीय, अवैध शारीरिक संबंध अथवा अन्य संवेदनशील विषयांशीच निगडित असतात. त्यात अनेकदा धार्मिक भावनादेखील भडकावण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप याचिकेत केला आहे. तर वेबसीरिजवर नुकत्याच प्रसारित झालेल्या काही वादग्रस्त सीरिजचीही नावे देण्यात आली आहेत. या वेबसीरिजचा सर्वाधिक परिणाम युवकांच्या मानसिकतेवर होतो आहे. तरुण पिढी त्यामुळे गैरमार्गाला लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या वेब माध्यमांवर नियंत्रण ठेवण्यात यावे, अशी मागणी याचिकेत केली आहे.
टीव्ही अथवा वृत्तपत्रांतील प्रत्येक बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रेस कौन्सिल, सेन्सॉर बोर्ड अथवा इतर नियंत्रण करणाऱ्या प्राधिकारिणी आहेत. परंतु, वेबसीरिजवर कोणाचेही नियंत्रण नाही. तेव्हा अशाप्रकारच्या वेबसीरिजवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा विकसित करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने अॅड. श्याम देवानी यांनी बाजू मांडली. तर केंद्र सरकारच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल उल्हास औरंगाबादकर व राज्य सरकारच्यावतीने सरकारी वकील सुमंत देवपुजारी यांनी नोटीस स्वीकारली.
अधिक वाचा : ‘‘राष्ट्रीय आयुर्वेद क्रिडा महोत्सव’’ मध्ये श्री आयुर्वेद महाविद्यालयाचे सुयश