नागपूर : नद्या, सरोवरे व तलाव ही आपली संपत्ती आहे. तिची स्वच्छता व सौंदर्यीकरण ही आपली कर्तव्यच आहे. तलावांचे सौंदर्यीकरण व स्वच्छता ही नागरिकांचा पुढाकार आवश्यक असल्याचे प्रतिपादन दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांनी केले आहे. नागपूर महानगरपालिका, क्लिन फाऊंडेशन, पतंजली योग समिती, सोनझारी नगर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सक्करदरा तलाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महिला व बाल कल्याण समिती सभापती प्रगती पाटील, गलिच्छ वस्ती निर्मुलन समिती सभापती अभय गोटेकर, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, हनुमाननगर झोन सभापती रूपाली ठाकूर, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका स्नेहल बिहारे, झोन सहायक आयुक्त हरिश राऊत, क्लिन फाऊंडेशनचे दीपक नीलावार, राजू नागुलवार, नामदेव फटिंग प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुधाकर कोहळे म्हणाले, शहरातील सर्व नद्या व तलाव ही आपली संपत्ती आहे. ही स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. नागरिकांच्या सहकार्यानेच तलावाची स्वच्छता ही शक्य आहे. सक्करदरा तलाव हे दक्षिण नागपूरचे भूषण आहे. दक्षिण नागपुरातील हा एकमेव तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी या भागातील नागरिक नेहमी जागरूक राहतात. गणेशोत्सवाच्या काळात या तलावात एकही मूर्ती विसर्जीत झाली नाही. परंतू काही काळानंतर त्याठिकाणी जलपर्णी तयार झाली आहे. त्यातील जलपर्णी व गाळ काढण्याचे काम करून हा तलाव पूर्णपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. परिसरातील सौदर्यींकरण व स्वच्छता यासाठीचा 27 कोटीचा प्रस्ताव हा शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. या प्रस्तावाचा मी स्वःता पाठपुरावा करत आहे, असेही त्यांनी प्रतिपादित केले.
माजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर या दरम्यान अटल सेवा सप्ताह या कार्यक्रमाअंतर्गत सक्करदरा तलाव स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. यावेळी शालेय विद्यार्थी उपस्थित होते. दररोज तीन दिवस शालेय विद्यार्थी या ठिकाणी स्वच्छेतेसंदर्भात जनजागृती करणार असल्याची माहिती आमदार सुधाकर कोहळे यांनी दिली.
अधिक वाचा : महापौर चषक कराटे स्पर्धेचे उद्घाटन