भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हैदोस घातला आहे. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता लावकाराचे तिसरी लाट येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय या लाटेचा चिमुकल्यांवर परिणाम होणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. अशातच एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. अमेरिकन फार्मा कंपनी फायझरने (Pfizer) दावा केला आहे की, त्यांची लस भारतात पसरलेल्या कोरोना व्हायरस विरूद्ध प्रभावी आहे. दरम्यान कंपनीने लस साठवण्याबाबतही चर्चा केली. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान भारताला ५ कोटी डोस देण्यास फायझर(Pfizer) तयार आहे. फायझर (Pfizer) फार्मा कंपनी देशात फास्ट ट्रॅक मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
फायझरने (Pfizer) त्यांच्या कोरोना लसीच्या वापरासाठी मंजुरी मागत भारतीय अधिकाऱ्यांना ही लस भारतात सापडलेल्या व्हेरिअंटबाबतही अधिक प्रभावशाली असल्याचे म्हटले आहे. तसेच ही लस १२ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांनाही दिली जाऊ शकते असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीची नुकतीच भारतीय अधिकाऱ्यांसोबत एक बैठक पार पडली. यामध्ये जागतिक आरोग्य संघटना आणि अन्य देशांमध्ये केलेल्या चाचणीद्वारेर ही लस किती प्रभावी आहे यासंदर्भातील समोर आलेली आकडेवारीही सादर करण्यात आली.
दरम्यान, कंपनीने लसीच्या वापरासाठी फास्ट ट्रॅक मंजुरी देण्यासाठी विनंती केली आहे. याशिवाय प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाईसारख्या दाव्यांतून सुरक्षेसहित महत्त्वाच्या बाबतीत नियमकाने सूट दिली तर जुलै ते ऑक्टोबर या काळात ५ कोटी डोस रोल आऊट करेल, असे कंपनीने म्हटलेआहे. सध्या देशात Covishield, Covaxin आणि Sputnik V या लसींच्या वापरास मंजुरी मिळाली आहे. यांना कोणत्याही प्रकारची सूट सरकारनं दिली नाही जशी Pfizer कडून मागण्यात येत आहे.