नागपूर – “एका गाडीत एकत्र आलो नसलो तरी स्टेशनवर तरी एकत्र आलो आहोत, मात्र एकमेकांचा हात, कामाची साथ आपण तरी सोडणार नाही’ असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले. नागपूर मेट्रोच्या लोकमान्यनगर ते सीताबर्डी अॅक्वा लाईनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ काॅन्फरंन्सिगद्वारे केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, उर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धन व क्रीडा मंत्री सुनील केदार, खासदार कृपाल तुमाने, खासदार विकास महात्मे, महापौर संदीप जोशी, आमदार विकास ठाकरे व मोहन मते, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मेट्रोला हिरवी झेंडी दाखवली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. आपण एका गाडीत बसू शकलो नाही, पण एका स्टेशनवर आलो आहे. यापुढे राज्य व केंद्र सरकारने मिळून काम केले, तर महाराष्ट्र-दिल्ली विकासाची मेट्रो सुरू करणे शक्य होईल. मी कधीही श्रेय घेतले नाही. आम्हाला श्रेय घ्यायचे नाही.
जाहिरातीमध्ये नाव नसल्याने नितीन राऊत यांची नाराजी
नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी महामेट्रोला शुभेच्छा देत असतानाच नाराजीचा सूर आळवला. मेट्रोच्या शुभारंभाच्या जाहिरातींमध्ये पालकमंत्री म्हणून आपले नाव नसल्याबद्दल तीव्र शब्दात राऊत यांनी संताप व्यक्त केला. पानभर जाहिरातीत पालकमंत्री म्हणून आणि राज्याचे मंत्री म्हणून कोणताही उल्लेख नव्हता. त्यामुळे ते चांगलेच संतापले होते.