नागपूर : पावसाळ्यात व्याघ्र प्रकल्पात असलेल्या पर्यटन बंदीबाबत पुनर्विचार करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या संदर्भातील प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे पाठविण्यात यावे असेही मुख्यमंत्र्यांनी सूचित केले आहे. ज्यातील वन्यजीवांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाची १४वी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी पर्यटनबंदीच्या मुद्द्याला स्पर्श केला.
यावेळी वित्तमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, समिती सदस्य आमदार बंटी भांगडिया, आमदार प्रभुदास भिलावेकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, वन सचिव विकास खारगे यांच्यासह राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी राज्याचे स्वतंत्र धोरण निश्चित केले जावे. या धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना केली जावी. व्याघ्र प्रकल्पात पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर व्हावा व त्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे. प्रत्येक व्याघ्र प्रकल्पात वाघांचा मागोवा ठेवण्यासाठी व पुढील मानव आणि वन्यजीव संघर्षावर नियंत्रण ठेवण्याकरिता प्रशिक्षित हत्तींची गरज आहे. अशा हत्तीची स्वतंत्र पथके तैनात केली जावीत, असेही ते म्हणाले.
चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गांचे काम करतांना वन्यजीवांचे कॉरिडॉर अडचणीत येऊ नयेत यासाठी लागणारा निधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागावा. तो कमी पडल्यास राज्य सरकारकडून उर्वरित निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. उमरेड कऱ्हांडला अभयारण्याचा विस्तार करताना तिथे असलेल्या गावांच्या पुनर्वसनाकडेही लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिली. वन्यजीवांचे कॉरिडॉर्स जपण्याची आवश्यकता आणि स्थानिकांच्या सुरक्षिततेचा विचार करण्याची गरज या बैठकीत उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली. गडचिरोलीसारख्या समृद्ध नैसर्गिक अधिवासात वाघांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षाही या बैठकीत मांडण्यात आली.
अधिक वाचा : ‘नागपूर महाराज बाग’ बंद करायला नागरिकांचा विरोध