नागपूर : चेक बाउन्स प्रकरणात न्यायालयाने सचिन जागेश्वर पाटील (रा. नरेंद्रनगर) याला तीन महिन्यांची शिक्षा व ३० लाखांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त शिक्षेचे निर्देशही न्यायालयाने दिले.
न्यू प्रॉस्परिटी डेव्हलपर्सचे संचालक डॉ. राजेंद्र श्यामराव पडोळे यांनी दक्षिण-पश्चिममधून २०१४मध्ये विधानसभा निवडणूक लढविली होती. याचदरम्यान त्यांची सचिनसोबत ओळख झाली. सचिनने मौजा बेसा येथील भूखंड खरेदी करण्यासाठी पडोळे यांना ३० लाख रुपये मागितले. काही रोख व उर्वरित रकमेचा धनादेश पडोळे यांनी त्याला दिला. काही दिवसांनी पडोळे यांनी सचिनला पैसे परत मागितले. त्याने पडोळे यांना ३० लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, हा धनादेश वटला नाही. पडोळे यांनी अॅड. लुबेश मेश्राम यांच्यामार्फत न्यायालयात खटला दाखल केला. याप्रकरणाची शीतल कौल यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. अॅड. मेश्राम यांनी पडोळे यांच्यावतीने न्यायालयात सबळ पुरावे सादर केले. दोष सिद्ध झाल्याने न्यायालयाने सचिनला तीन महिन्यांची शिक्षा व ३० लाखांचा दंड ठोठावला. ४० दिवसांत दंड न जमा केल्यास तीन महिने अतिरिक्त शिक्षा सुनावली. पडोळे यांच्याकडून अॅड. लुबेश मेश्राम यांनी तर सचिनकडून अॅड. अजय गंगोत्री यांनी काम पाहिले.
अधिक वाचा : नळ योजनेचे थकीत दंड व्याज माफ : चंद्रशेखर बावनकुळे