भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-२ या मोहिमेचे प्रक्षेपण पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आले आहे. त्यामुळे, या यानाचे प्रक्षेपण आता जानेवारीनंतरच होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
‘इस्रो’ च्या नियोजनानुसार, ही मोहीम एप्रिलमध्ये होती, त्यानंतर हे प्रक्षेपण ऑक्टोबरमध्ये निश्चित करण्यता आले होते. मात्र, वर्षभरामध्ये दोन मोहिमांमध्ये गंभीर त्रुटी समोर आल्या, त्यामुळे चंद्रावरील महत्त्वाकांक्षी मोहीम लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लष्करी दळणवळणासाठी सोडण्यात आलेल्या ‘जीसॅट-६ए’ या उपग्रहाचा प्रक्षेपणानंतर संपर्क तुटला होता. त्यानंतर ‘जीसॅट-११’ या उपग्रहाच्या प्रक्षेपण तांत्रिक तपासणीवेळी थांबविण्यात आले होते. याशिवाय, सप्टेंबरमध्ये ‘पीएसएलव्ही-सी३९’ मोहिमेमध्ये ‘आयआरएनएसएस-१एच’ उपग्रहाचे उष्णतारोधक कवच ऐनवेळी उघडले नव्हते.
इस्रोसाठी ‘चांद्रयान-२’ ही मोहीम अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. चांद्रयान-१ आणि मंगळयानानंतर प्रथमच ‘इस्रो’मोठी मोहीम राबवत आहे. यामध्ये एक रोव्हर चंद्रावर सोडण्यात येणार असून, आतापर्यंत कोणत्याच संशोधनामध्ये समोर न आलेल्या दक्षिण ध्रुवावरील निरीक्षणे हा रोव्हर घेईल.
या मोहिमेसाठी ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कोणत्याही अवकाशातील घटकावर उपकरण उतरविण्याची इस्रोची ही पहिलीच वेळ आहे. ‘आम्ही कोणताही धोका पत्करू इच्छित नाही,’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या मोहिमेसाठी ठराविक अवकाशीय स्थिती आवश्यक असते आणि जानेवारीमध्ये ही स्थिती आहे. त्यामुळे, ही मोहीम जानेवारीमध्येच असेल, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.
अधिक वाचा : BrahMos missile successfully test-fired under extreme conditions