नागपूर : अपघात झाल्यानंतर दीड महिने उपचार घेतला. बरा होताच नागपुरात येऊन चेनस्नॅचिंग करणाऱ्या कुख्यात ३४ वर्षीय सोनसाखळी चोराला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. भारत गुरदासमल वासवानी रा.खडगाव, अमरावती,असे चोरट्याचे नाव आहे.
रविवारी सायंकाळी ६२ वर्षीय रघुनंदिनी सुंदरम रंजन या पायी जात होत्या. शिवाजीनगर भागात मोटरसायकलवर आलेल्या लुटारुने त्यांच्या गळ्यातील ६८ ग्रॅमची सोनसाखळी हिसकावली व पसार झाला. रंजन यांनी अंबाझरी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, उपनिरीक्षक मंगला मोकाशे, राजेंद्र बघेल, हेडकॉन्स्टेबल शैलेश ठवरे, सुरेश हिंगणेकर, अनिल दुबे, अतुल दवंडे, श्याम कडू व शरीफ शेख यांनीही अंबाझरी पोलिस स्टेशन गाठले. अंबाझरी पोलिसांच्या मदतीने गुन्हे शाखा पोलिसांनी वाडी भागातून वासवानी याला अटक केली. त्याच्याकडून सोनसाखळी जप्त केली.
अधिक वाचा : नागपुरात माजी पोलीस आयुक्तांकडे चोरी, मंदिरातील सोन्याची मूर्ती, साहित्य लंपास