नागपूर : शहरातील सिमेंट काँक्रिटचे रस्ते निधीअभावी रखडले असताना आता केंद्राच्या निधीतून तयार होत असलेल्या रिंग रोडला मिळणाऱ्या निधीची गती मंदावली आहे. यामुळे केंद्रीय निधी योजनेतील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची कामे रखडल्याची माहिती पुढे आली.
केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत ४१.४५ किलोमीटरच्या रिंग रोडचे काँक्रिटीकरण केले जात आहे. या रस्त्याचा कालावधी दोन वर्षांचा निश्चित होता. निविदा २० टक्के कमी दराने कंत्राटदाराला दिल्याने २९२.७२ कोटींच्या रस्त्याची किंमत २६० कोटींवर आली. त्यापैकी आतापर्यंत केवळ १४९ कोटींचा निधी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे कंत्राटदारांची देयके थांबली आहेत. त्याचा फटका रिंग रोडच्या कामाला बसला. कामाची वाढलेली व्याप्ती आणि कामामुळे कालावधी वाढल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र, निधी न मिळणे हे मुख्य कारण असल्याची बाब पुढे आली.
सिमेंट काँक्रिटचे काम ३४ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमानात केल्यास कामाचा दर्जा खालावतो. उन्हाळ्यात तापमानही ४५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक असते. त्या तापमानात काम करणे कठीण असल्याने तशीच कामाची गती कमी असताना आता निधीचा प्रश्न ऐरणीवर आल्याने कामे रखडली आहेत.
अधिक वाचा : थकीत पाणी बिल व अवैध कनेक्शनबाबत मनपाचा कठोर पवित्रा