नागपूर : देशातील वाढते आतंकवादी हल्ले, परकीय राष्ट्रांमधून होणारी घुसखोरी या सर्व कारवायांसाठी सर्जिकल स्ट्राईक हे चोख उत्तर ठरले. भारतीय सैन्याच्या या पराक्रमामुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावली. सर्जिकल स्ट्राईक ही येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारी बाब आहे, असे गौरवोद्गार महापौर नंदा जिचकार यांनी काढले.
पाकिस्तान विरोधात भारतीय सैन्यामार्फत करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने शहरातील अंबाझरी उद्यानात ‘पराक्रम पर्व’ साजरा करण्यात आला. यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्यासह सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, विजय होले, रवि हलकंदर, गुंडूभाऊ मसुरकर, मनिष गेडाम, विनोद चवरे, संगीता चंद्रायण, कविता देशमुख, रश्मी नसीने, योगिता धार्मिक, अनुसया गुप्ता आदी उपस्थित होते.
२९ सप्टेंबर २०१६ ला दोन वर्षापूर्वी भारतीय सैन्याने आपल्या देशात घुसखोरी करून देशात आतंकवादी कारवाया करीत देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्यांचे तोंड बंद केले. सीमेवर अहोरात्र देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्याने केलेली ही कामगिरी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. सैन्याच्या या पराक्रमामुळे अनेक तरुणांच्या मनात देशरक्षणाची बिजे रोवली गेली. देशाच्या भवितव्याची धुरा असणाऱ्या तरुणाईने आपण भारतीय असल्याचा अभिमान बाळगावा व आपल्या कार्यामुळे देशाचे नाव लौकीक होईल, असेच कार्य करावे, असे आवाहनही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले.
देशाच्या सीमेवर शत्रुकडून येणारी गोळी झेलून त्याला प्रत्युत्तर देण्यास तत्पर असणाऱ्या सैन्यामुळे आपण घरामध्ये सुखाने राहू शकतो. भारतीय सैनिक हेच देशातील खरे हिरो आहेत. तिरंग्याच्या सन्मानासाठी प्राण पणाला लावणाऱ्या आपल्या सैन्यांचा प्रत्येकाने आदर राखावा, असेही महापौर नंदा जिचकार यावेळी म्हणाल्या. कार्यक्रमाला अंबाझरी परिसरातील नागरिकांसह, उद्यानातील कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
अधिक वाचा : वातावरणाची माहिती देणारे डिजिटल फलक अल्पावधीतच कूचकामी