CBSE बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षांसाठी नियम जारी केले आहे , जाणून घ्या ते कोणते …

CBSE बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षेचे नियम जारी केले आहे , जाणून घ्या ते कोणते ...

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. हे परिपत्रक दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा (CBSE 10th 12th practical), प्रकल्पांचे काम आणि अंतर्गत मूल्यांकनाबद्दल आहे. मंडळाने सर्व संबंधित शाळांना हे परिपत्रक पाठविले आहे. या परीक्षांबाबत कोणते नियम आहेत ते जाणून घ्या.

आतापर्यंत सीबीएसई प्रात्यक्षिक परीक्षा १ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत होत होत्या. पण यावेळी कोविडमुळे संपूर्ण सत्र उशिरा सुरू झाले. परिणामी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा मे-जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षांचा कालावधीही वाढविण्यात आला आहे. यावेळी मंडळाने सर्व शाळांना दिनांक १ मार्च २०२१ ते ११ जून २०२१ या कालावधीत दहावी आणि बारावीच्या सर्व प्रात्यक्षिक परीक्षा, प्रोजेक्ट वर्क आणि अंतर्गत मूल्यांकन पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

CBSE practical, project, internal exams 2021: हे आहेत नियम –
१. या परीक्षा संपल्यानंतर शाळांनी सर्व विद्यार्थ्यांचे गुण मंडळाच्या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकद्वारे अपलोड करावे लागतील. गुण अपलोड करताना विशेष काळजी घ्यावी लागेल कारण सीबीएसई त्यामध्ये सुधारणा करण्याची दुसरी संधी देणार नाही.

२. प्रत्यक्ष परीक्षा केवळ मंडळाने नियुक्त केलेल्या परीक्षकाद्वारे घेतली जाईल. जर एखाद्या शाळेने ही परीक्षा एखाद्या शिक्षकाद्वारे घेतली तर ती रद्द होईल. विद्यार्थ्यांना थिअरी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे सरासरी गुण दिले जातील. तसेच शाळेची मान्यता रद्द होईल आणि तेथील प्राचार्यांविरोधात कारवाई केली जाईल.

३. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत येऊन प्रात्यक्षिक परीक्षा आणि अंतर्गत मूल्यांकन द्यावे लागेल. बाह्य परीक्षक तसेच अंतर्गत परीक्षकही प्रत्येक शाळेत यासाठी उपलब्ध असतील. या परीक्षांच्या देखरेखीसाठी मंडळामार्फत निरीक्षकही नेमले जातील.

४. शाळांना १ मार्च ते ११ जून २०२१ पर्यंत अंतर्गत गुण अपलोड करावे लागतील. ११ जूननंतर यास परवानगी दिली जाणार नाही आणि ही मुदतदेखील वाढविली जाणार नाही.

५. ज्या विद्यार्थ्यांना ठरलेल्या तारखेला प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापन परीक्षेस उपस्थित राहता येणार नाही, त्या विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीची माहिती शाळांना संबंधित सीबीएसई रिजनल ऑफिसला द्यावी लागेल. त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेतली जाऊ शकते, ज्यांच्यासाठी परीक्षकांची नेमणूक प्रादेशिक कार्यालयामार्फत केली जाईल. या पुनर्परीक्षा ११ जून २०२१ पूर्वी घेता येतील. यानंतर कोणतीही संधी मिळणार नाही.

६. या परीक्षांच्या वेळी प्रत्येक शाळेने कोविड -१९ सुरक्षाविषयक नियमांचे योग्य पालन केले पाहिजे. जर २५ विद्यार्थ्यांची तुकडी असेल तर त्यांना दोन लहान गटात विभागून परीक्षा दिली जाऊ शकते. पुढे दिलेल्या सीबीएसई नोटिस दुव्यावर क्लिक करुन तुम्ही तपशीलवार माहिती मिळवू शकता.