नागपूर : सीबीआयच्या मुख्यालयात अचानक बदल्या झाल्या असून त्यामुळे नागपुरातील सीबीआयला पहिल्यांदाच पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाचा अधिकारी लाभला आहे. मनीषकुमार सिन्हा यांची येथे नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे सीबीआय कार्यालयात विविध चर्चांना ऊत आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरला सीबीआयचे लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक कार्यालय आहे. हे नागपुरातील सर्वांत मोठे कार्यालय होते. यापेक्षा मोठ्या दर्जाचा अधिकारी नागपुरात यापूर्वी नव्हता. मात्र, देशाच्या सर्वांत मोठ्या तपास यंत्रणेपैकी एक सीबीआयच्या अंतर्गत वादाच्या दरम्यानच मोठी घडामोड घडली आहे. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर अस्थाना यांच्यासह सीबीआयचे मुख्य संचालक आलोक वर्मा यांनाही सुट्टीवर पाठवण्यात आले आहे. एम. नागेश्वर राव यांची तातडीने प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिन्हा हे यापूर्वी नवी दिल्लीत सीबीआयच्या मुख्यालयात होते. मात्र, अचानक बदल्यांचे वारे वाहू लागल्यामुळे त्यांची बदली नागपुरात करण्यात आली. त्यांना पोलिस अधीक्षक विजयेंद्र बिदारी यांच्याकडून पदभार घेण्याचे आदेश सीबीआयने काढले.
अधिक वाचा : मनपाच्या विद्यार्थ्यांचे सामाजिक संदेश देणारे नाटक राज्यस्तरावर