नागपूर : लष्करी जवानांना सोडून परत आलेल्या एका विशेष गाडीत जवळपास ४५० जिवंत काडतुसे सापडल्याने रेल्वेस्थानकावर खळबळ उडाली. ही घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली.
लष्करी जवानांना घेऊन एक विशेष गाडी लखनौ ते विजयवाडा अशी गेली होती. मंगळवारी या गाडीतील जवान विजयवाड्याला उतरले. त्यानंतर ही विशेष गाडी बुधवारी सकाळी देखभालीसाठी अजनी यार्डात गेली. येथील काम आटोपल्यावर ही गाडी नागपूर स्थानकावरील यार्डात आली. तेथे गाडी स्वच्छ करीत असताना सफाई कर्मचाऱ्याला बर्थखाली एक हिरव्या रंगाची पेटी आढळली. त्याने लगेच आरपीएफला याबाबत माहिती दिली. त्यामुळे आरपीएफने तेथे धाव घेतली. ते पेटी ठाण्यात आणून उघडली असता त्यात ४५० जिवंत काडतुसे पाहून खळबळ उडाली.
चौकशीत ही गाडी लष्करी जवानांना पोहोचविण्यासाठी ही गाडी विजयवाड्याला गेली होती. ही गाडी तेथून परत आलेली असल्याचे कळल्यावर या जवानांपैकीच कुणाची तरी ही काडतुसे असावी, अशी शक्यता आहे. आरपीएफने पंचनामा करून ही काडतुसे पुढील कार्यवाहीसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिली. आता लोहमार्गचे सहायक पोलिस निरीक्षक शेख या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
अधिक वाचा : स्वतःचं जिम सुरु करण्यासाठी घरफोडी, दोन बॉडीबिल्डर्स अटकेत