महिला सक्षमीकरण साठी मनपा समाजकल्याण विभागाचे ‘चलो चले प्रगति की ओर’ अभियान
नागपूर :- आजच्या आधुनिक युगात महिला पुरूषांच्या बरोबरीने वाटचाल करीत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या महिलांमध्ये गृहिणींचे योगदान महत्वपूर्ण आहे. घराची जबाबदारी सांभाळणा-या महिला सक्षमीकरण साठी, समाजात सन्मानाचे स्थान मिळविण्यासाठी आता एकत्र येणे गरजेचे असे सांगत नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी एकीची हाक दिली.
नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण समितीच्या वतीने गुरूवारी (ता. १९) मंगळवारी झोनमधील महिला बचत गटांच्या सदस्यांकरिता ‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानांतर्गत छावनी येथील दुर्गा माँ प्रार्थना भवन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रगती पाटील बोलत होत्या. शहरी महिला बचत गटातील महिलांना लघुउद्योगाचे धडे देत त्यांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने या अभियाला सुरूवात करण्यात आली. व्यासपीठावर महिला व बालकल्याण समिती प्रगती पाटील यांच्यासह उपसभापती विशाखा मोहोड, सदस्या मनिषा अतकरे, रश्मी धुर्वे, नसिम बानो खान मोहम्मद इब्राहिम, अर्चना पाठक, संगीता गि-हे, सुषमा चौधरी, स्वच्छ असोसिएशनच्या शेफाली दुधबडे, उषा बागडी उपस्थित होते.
पुढे बोलताना सभापती प्रगती पाटील म्हणाल्या, उत्तमपणे कुटुंबाचा भार वाहणा-या महिलांमध्ये व्यवस्थापनाचे उत्तम कौशल्य असते. लघु उद्योग हा स्त्रीच्या उन्नतीचा मार्ग आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या व्यवसायात योग्य भरारी घेऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांच्या उत्थानासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची पूरेपूर माहिती घेउन त्याच्या अंमलबजावणीसाठी कशी करावी, शिवाय बँकांकडून आर्थिक सहकार्य कसे मिळविता येईल याची माहिती एकत्रितरित्या मिळावी, यासाठी प्रत्येक झोनमध्ये अभियानाची ओळख करून देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. स्वयं सक्षमीकरणासाठी महिलांनी पुढाकार घेत अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे संचालन नगरसेविका सुषमा चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला मंगळवारी झोनमधील पंचशील महिला बचत गट, वैष्णवी महिला बचत गट, शितला माता महिला बचत गट, अमरदीप महिला बचत गट, सखी महिला बचत गट, साची महिला बचत गट, मानसी महिला बचत गट, जयमाता महिला बचत गट, यशस्वी महिला बचत गट आदी महिला बचत गटांनी सहभाग घेतला.
टाकाऊ पासून सुदंर व टिकाऊ वस्तू निर्मीतीचे प्रशिक्षण
‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानामार्फत स्वच्छ असोसिएशनच्या शेफाली दुधबडे यांनी कार्यक्रमात उपस्थित विविध बचत गटाच्या महिलांना टाकाऊ पासून सुंदर व टिकाऊ वस्तू कशा तयार करता येतील, याची माहिती दिली. यावेळी सभागृहात लघुउद्योगामार्फत तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते.
अधिक वाचा : विदर्भातील प्रतिभावंत कलावंतांसाठी व्यासपीठ ‘व्हाईस ऑफ विदर्भ’