नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अंतर्गत सुरू असलेल्या नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेजसाठी अर्थसंकल्पात १२५ कोटी रुपये, तर नागपूर- वर्धा थर्ड लाइनसाठी १ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
अर्थमंत्री अरुण जेटली उपचारांसाठी अमेरिकेत असल्याने शुक्रवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात रेल्वेसंबंधी फार घोषणा करण्यात आल्या नसल्या तरी जुनी कामे वेगाने व्हावीत, यासाठी निधीची तरतूद केली असल्याचे जाणवते.
नागपूर स्थानकाच्या तिन्ही दिशांना होणाऱ्या थर्ड लाइनसाठी ३६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मध्यरेल्वे व दपूमरेच्या नागपूर विभागाला अर्थसंकल्पात जवळपास १५०० कोटी रुपयांहून अधिक तरतूद झाली आहे. यातही सर्वाधिक रक्कम नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेज साठी मिळाली आहे.
नागपूर-छिंदवाडा आधी नॅरोगेज लाइन होती. मात्र, चार वर्षांपूर्वी तेथे ब्रॉडगेज करण्याचा निर्णय झाला व कामाला प्रारंभ झाला. आता हे काम आता पूर्णत्वास आले आहे. मुळात हे संपूर्ण काम १ हजार कोटी रुपयांचे आहे. मागील वर्षीपर्यंत या कामांसाठी ७८० कोटी रुपये देण्यात आले आहेत. सध्या भंडारकुंड ते भिमलागोंडीपर्यंतचे काम व्हायचे आहे. आता या कामासाठी १२५ कोटी रुपये मिळाल्याने या वर्षाच्या अखेरपर्यंत हा मार्ग पुन्हा पूर्ण होईल, असा अंदाज आहे. नागपूर- वर्धा थर्ड लाइनसाठी २५० कोटी रुपयांचा खर्च आहे. मात्र या कामासाठी केवळ १ कोटी देण्यात आल्याने हे काम किती वेगाने होईल, हा प्रश्नच आहे.
नागपूर-इटारसी थर्ड लाइनसाठी १५ कोटी
तीन वर्षापूर्वी इटारसी-वर्धा थर्ड लाइनची घोषणा झाली होती. या मार्गासाठी १४ कोटी ९९ लाख रुपये देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे नागपूर-राजनांदगाव थर्ड लाइनसाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दपूमरे अंतर्गत वडसा-गडचिरोली या नव्या मार्गासाठी २९ कोटी ९० लाख रुपये देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जबलपूर-गोंदियासहच बालाघाट-कटंगीसाठी १२५ कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्र्यांनी केली आहे.
अधिक वाचा : Budget 2019 : अजनी सॅटेलाईट टर्मिनलसाठी ८ कोटी