कुख्यात गुंडाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

नागपूर – गुन्हेगारी वृत्तीच्या मोबाईल शॉपी धारकाला धमकी देणे एका गुंडासाठी जीवघेणे ठरले. तो गेम करू शकतो, या भीतीमुळे आरोपीने आपल्या साथीदाराच्या मदतीने त्याची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. रविवारी दुपारी ३ ते ४ च्या सुमारास लंडन स्ट्रीटलगतच्या झुडपीभागात ही घटना घडली. त्याचा साथीदार मात्र या हल्ल्यात बचावला. त्यानेच नंतर पोलिसांना ही माहिती दिली.

नीलेश राजेश नायडू (वय ३०) असे मृतकाचे नाव आहे. त्याची हत्या केल्याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आरोपी मयूर शेरेकर, गोविंद डोंगरे, सागर बग्गा, सुजीत चांदणे आणि आशिष बांदेकर या पाच गुंडांना अटक केली.

नीलेश नायडू हा कुख्यात गुंड होता. त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न, लुटमार आदी गंभीर गुन्हे दाखल होते. तो दारू पिऊन कुणासोबतही वाद घालायचा आणि बेवारससारखा मिळालेल्या त्या जागी पडून राहायचा. दोन दिवसांपूर्वी त्याने आरोपी मयूर शेरेकरच्या मोबाईल शॉपमध्ये जाऊन त्याच्याशी वाद घातला होता. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मयूरही गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याला नायडू काहीही करू शकतो, याची कल्पना होती. तो आपला गेम वाजविणार अशी शंका आल्याने त्याने त्याचीच हत्या करण्याचे कटकारस्थान रचले. त्यानुसार त्याने साथीदारांची जुळवाजुळव केली. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास नायडू त्याचा मित्र प्रतीक सहारेसोबत आरोपींना लंडन स्ट्रीट ( रॅडीसन ब्ल्यू चाैक ते जयताळा मार्ग) लगतच्या झुडपाकडे जाताना दिसला. त्यामुळे मयूर आणि त्याच्या साथीदारांनी चाकू, रॉड घेऊन नायडू तसेच सहरेला त्या निर्जन ठिकाणी घेरले. आरोपींचे टार्गेट नायडूच होते. त्यामुळे त्याच्यावर चाकूचे सपासप घाव घालून आणि रॉडने प्रहार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. प्रतीकला जुजबी मारहाण करून आरोपींनी पळवून लावले. तो गेल्यानंतर आरोपींनी नायडूला दगडानेही ठेचले. तो ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर आरोपी पळून गेले.

सायंकाळी ५ च्या सुमारास या हत्येच्या गुन्ह्याची सहारेने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सोनेगाव पोलीस घटनास्थळी धावले. दरम्यान, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके, उपायुक्त नुरूल हसन यांनी सोनेगावचे ठाणेदार दिलीप सागर यांना तसेच विविध पोलीस पथकांना कामी लावले. त्यांनी आरोपींची नावे मिळवून रात्री या पाचही आरोपींना अटक केली.

तीन दिवसांपूर्वीच कारागृहातून परतला

कुख्यात नायडू हा शुक्रवारी सायंकाळी कारागृहातून जामिनावर बाहेर आला. आल्याआल्याच त्याने खंडणी वसुलीसाठी दादागिरी सुरू केली. तो कुणालाही, कधीही मारू शकतो, याची कल्पना असल्याने धमकी मिळताच मयूर शेरेकरने त्यालाच यमसदनी धाडले.