लसीकरण : स्तनदा मातांनी घ्या ‘कोव्हिड-19’ची लस

लसीकरण : स्तनदा मातांनी घ्या ‘कोव्हिड-19’ची लस

 डॉ. अर्चना साळवे

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ‘कोव्हिड-19’ लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. ‘कोव्हिड-19’ची लस मात्र, लसीकरणासंदर्भात लोकांच्या मनात भीती असल्याने बहुतेक लोक लसीकरण करून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यातच आता स्तनदा मातांसाठी लसीकरणाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. मात्र, लसीकरणाबाबत अनेक गैरसमज असल्याने स्तनपान करणार्‍या महिला ही लस घेण्यास पुढे येताना दिसून येत नाहीत.

स्तनपान करणार्‍या मातांनी ‘कोव्हिड -19’ लसीकरण करून घेणे खूप गरजेचे आहे, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत. लसीकरणामुळे मातेच्या शरीरात तयार होणार्‍या अँटिबॉडीज स्तनपानाद्वारे नवजात बाळाला मिळतात. यामुळे बाळाला कोरोना संसर्गाचा धोका कमी संभवतो.

स्तनदा मातांनी घ्या ‘कोव्हिड-19’ची लस , ‘कोव्हिड-19’ व्हायरस संक्रमणाची चेन ब्रेक करण्यासाठी जानेवारी 2021 पासून लसीकरण अभियान सुरू करण्यात आले. या अभियानांतर्गत 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. परंतु, गर्भवती आणि स्तनदा मातांना या लसीकरण अभियानातून वगळण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत गर्भवतींना संक्रमणाचा अधिक धोका असल्याचे म्हटले होते.

यासंदर्भात ‘द इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’, आणि ‘द फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया’ या संस्थांनी विविध अभ्यास आणि संशोधनानंतर गर्भवती व स्तनदा मातांना लसीकरणात समाविष्ट करून घ्या असे म्हटले. त्याद्वारे केंद्र सरकारने गर्भवती व स्तनदा मातांनाही लसीकरण करून घेण्याची परवानगी दिली आहे.

लस घेणं का आवश्यक?

कोरोनाची लागण होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. भारतात सध्या कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक या तीन लसी उपलब्ध आहेत. स्तनपान करणार्‍या मातांसाठी ही लस अतिशय फायदेशीर आहे. म्हणूनच मातांनी लसीकरण अजिबात टाळू नये.

विविध संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की, स्तनपान करणारी महिला लसीकरण करते तेव्हा तिच्या शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडीज आईच्या दुधातून नवजात बाळाला जातात. यामुळे ‘कोव्हिड-19’ विषाणूपासून बाळाचे संरक्षण करण्यात मदत मिळते. यामुळे स्तनपान करणार्‍या महिलांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

लस घेतल्यानंतर ताप येणं, थंडी वाजून येणं, अंगदुखी, डोकेदुखी, इंजेक्शन दिलेल्या हातावरील भागात सूज येणं आणि थकवा जाणवणं, असा त्रास उद्भवू शकतो. परंतु, स्तनपान करणार्‍या महिलांनी घाबरून जाऊ नये. लसीकरणानंतर ही लक्षणे दिसून येणे स्वाभाविक आहे. ‘कोव्हिड-19’ लस माता आणि बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. म्हणून लसीकरणाला घाबरून त्याकडे दुर्लक्ष करू नये.

वाचा

COVID-19 vaccine : देशात मॉर्डना लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी