नागपूर: धावत्या रेल्वेत बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांचा वापर होणार असून प्रवासी आणि आरपीएफ जवानांच्या गैरवर्तणुकीची माहिती आता या कॅमेऱ्यात कैद होेणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) ट्रेन स्कॉटिंगमध्ये बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांचा उपयोग करीत आहेत. या कॅमेऱ्यांमुळे सुरक्षा जवान आणि प्रवाशांमध्ये होणाऱ्या संवादासह त्यांच्यातर्फे होणाऱ्या गैरवर्तणुकीची माहिती प्राप्त होणार आहे. अशा प्रकारचा प्रयोग नागपूर मंडळात पहिल्यांदा होत आहे.
रेल्वे स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये सर्व घटना कैद होत असून धावत्या रेल्वेत कॅमेराची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे दोन्ही पक्षांतर्फे होणाऱ्या गैरवर्तणुकीच्या माहिती मिळत नाही. परंतु आता जवानांच्या कॉलरवर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात सर्व घटना कैद होणार आहे. २६ जानेवारीला आरपीएफला १० कॅमेरे मिळाले असून रेल्वेत तैनात जवानांना हे कॅमेरे वितरित करण्यात आले आहे. रेल्वेत बॉडी वॉर्न कॅमेऱ्याचा प्रयोग पश्चिम रेल्वे व राजकोट मंडळात झाला आहे. नागपुरात दपूम रेल्वे मंडळ आरपीएफने पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सुरू केला आहे. कॅमेरा जवळपास ५ सेंटीमीटर लांब असून बॅटरीवर चालणारा आहे. एकदा चार्ज केल्यानंतर कॅमेरा १० तासांपर्यंत सुरू राहू शकतो. त्यातील रेकॉर्डिंग ३० दिवसांपर्यंत सुरक्षित ठेवता येते. आरोपानंतर कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग पाहून आणि ऐकून संबंधित प्रवासी आणि जवानांवर कारवाई करतांना सोपे जाईल.
अधिक वाचा : ‘समृद्धी’ च्या कामाला सुरुवात , नागपूर जिल्ह्यातून जाणार २८ किलोमीटरचा रस्ता