नागपूर : मध्यभारतातील पक्ष्यांच्या सर्वांगीण अभ्यासाला चालना देण्यासाठी आता नागपुरात ‘मध्य भारत पक्षी अकादमी’चा प्रयोग राबविला जाणार आहे. नागपुरातील नामवंत पक्षी अभ्यासक या प्रयोगासाठी एकत्र आले असून, विदर्भासहित मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील पक्ष्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी चिटणवीस सेंटर येथे या अकादमीचे उद्घाटन करण्यात येईल.
विदर्भात सुमारे ४५० पक्षी प्रजाती असून, त्यापैकी ३५ ते ४० प्रजाती या दुर्मिळ आणि नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा सर्व पक्षी प्रजातींचा विविध प्रकारे अभ्यास या अकादमीच्या माध्यमातून येत्या काळात केला जाणार आहे. सातपुडा पर्वतरांगांना लागून असलेला दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगडचा बहुतांश भाग आणि संपूर्ण विदर्भ या भूप्रदेशातील पक्षी वैविध्य आणि जैवविविधता बरीचशी जुळणारी आहे. या पक्ष्यांचे स्थलांतर, संवर्धन, विणीची पद्धत, संगोपन, त्यांचे अधिवास यांचा अभ्यास अकादमीच्या माध्यमातून केला जाणार आहे.
‘विदर्भात पक्षी, पाणवठे आणि इतर सर्व जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र या विविधतेचा शास्त्रीयदृष्ट्या फारसा अभ्यास झालेला नाही. त्यातून संशोधनाधारित साहित्य किंवा पुस्तके निर्माण झालेली नाही. संशोधनाची ही मानसिकता विदर्भात कमी आढळते. मात्र, या जैवविविधतेचा संशोधनाच्या दृष्टीने अभ्यास करण्याची मानसिकता निर्माण व्हावी या भूमिकेतून अकादमीची स्थापना करण्यात आली आहे,’ असे या अकादमीचे संचालक आणि ख्यातनाम पक्षीअभ्यासक डॉ. अनिल पिंपळापुरे यांनी सांगितले.
अधिक वाचा : नागपुरात सात दिवसांत ‘स्वाईन फ्लू’ चे चार बळी