नागपूर : भविष्यात इलेक्ट्रिक वाहनेच परवडणारी ठरणार असून, या वाहनांना लागणारे सुटे भाग चीनमधून आयात होण्याऐवजी नागपूर-विदर्भात सुटे भाग बनविणारे उद्योग निर्माण व्हावेत. यामुळे रोजगार निर्मिती होईल आणि आत्मनिर्भर भारत ही संकल्पना साकार होण्यास मदत होईल. यादृष्टीने विदर्भातील उद्योजकांनी प्रयत्न करावे. नागपूर आणि परिसर ई-व्हेईकलचे हब बनावे यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
वानाडोंगरी येथे ऑटो अॅण्ड इंजिनीअरिंग क्लस्टरच्या कोनशिला अनावरण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी खा. कृपाल तुमाने, आ. समीर मेघे, एमएसएमईचे संचालक प्रशांत पार्लेवार, अशोक धर्माधिकारी, रमेश पटेल आदी उपस्थित होते. नागपूर शहराची प्रगती व तरुणांना रोजगार हे माझ्या चिंतेचे विषय आहेत. त्याशिवाय आमची गरिबी आणि उपासमार थांबणार नाही, असे सांगताना गडकरी म्हणाले, ग्रामीण भाग विकासात मागासलेला आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्या रोखण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मिहानमध्ये आतापर्यंत 58 हजार बेरोजगारांना रोजगार मिळाला. पण बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर या एमआयडीसींमध्ये अपेक्षेप्रमाणे रोजगार निर्मिती झाली नाही. म्हणूनच येथील औद्योगिक क्षेत्र अधिक वाढविण्याची गरज आहे.
सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांच्या व्यवसायाची उलाढाल वाढविण्यासाठी नवीन संशोधन, तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक झाले असल्याचे सांगून ते म्हणाले, 56 अभियांत्रिकी महाविद्यालये नागपूरच्या परिसरात आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधन करून व कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ उपलब्ध करून नागपूरला प्रगतीकडे नेण्याची गरज आहे.
सीएनजीवर आता बस, कार, ऑटोरिक्षा चालविले जात आहेत. सीएनजी चांगल्या प्रकारे विकसित होत आहे. तसेच एलएनजी हे ट्रकसाठी फायदेशीर सिद्ध झाले आहे. डिझेलचा एक ट्रक एलएनजीवर रुपांतरित करण्यासाठी 12 लाख रुपये खर्च येतो. हा खर्च दोन वर्षात वसूलही होतो. मालवाहतूक ट्रक एलएनजीवर चालले तर 30 टक्के वाहतूक खर्चात बचत होते. इलेक्ट्रिक व्हेईकलचा वापर, वाहनांमध्ये जैविक इंधनाचा वापर वाढवून तशा वाहनांची निर्मिती करून येत्या 5 वर्षात नागपूर हे इलेक्ट्रिक व्हेईकल उत्पादनाचे नंबर एकचे शहर बनविण्याचे मी ठरवले असल्याचेही गडकरी म्हणाले.
सीएनजी या जैविक इंधनाचा वापर करण्यावर अधिक जोर देताना गडकरी म्हणाले, सीएनजीवर आता जेसीबी चालविण्याचे प्रात्यक्षिक यशस्वी झाले. परिणामी बांधकाम क्षेत्रातील उद्योजकांचा फायदा होईल. वेळेसोबत तंत्रज्ञानात होणारे बदल करून नवीन तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे. एमपीबीएस सी प्लेन, ब‘ॉडगेज मेट्रो या प्रकल्पांची त्यांनी यावेळी माहिती दिली. आगामी काळात विदर्भाची प्रगती झाली तर रोजगार निर्मिती होईल, असेही ते म्हणाले.