नागपूर : विवाहाला अनेक वर्षे उलटूनही मुलबाळ होत नसल्याने एक महिला भोंदू बाबाच्या संपर्कात आली. त्याने तिला सात लाख रुपयांनी गंडवले. भोंदूबाबाच्या आशीर्वादानेही मूल होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुकुश ऊर्फ टिल्लू बाबा ऊर्फ टिल्लू डागोर (६०) रा. रामनगर, पांढराबोडी आणि रजनी माहुले (३५) रा. बुद्धनगर उद्यानाजवळ अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पीडित ३२ वर्षीय महिलेचे दोन लग्न झाले. पहिल्या पतीपासून तिला मूलबाळ काहीच नव्हते. २०१२ मध्ये पहिल्या पतीचा मृत्यू झाला. २०१३ मध्ये तिने दुसरे लग्न केले. या दोघांचे लग्न होऊ न दोन वर्षे झाली तरीही तिला मूलबाळ नव्हते. त्यामुळे ती त्रस्त होती. तिच्या परिचयातील रजनी माहुले हिने तिला एका बाबाकडे चलण्याचा आग्रह केला. महिलेने ही माहिती आपल्या पतीला दिली. त्यानेही यासाठी परवानगी दिली. रजनीने पीडित महिलेची टिल्लू बाबासोबत भेट करून दिली. त्यावेळी बाबाने मूल होईल, पण त्यासाठी पूजा करावी लागेल आणि खर्चही खूप येईल असे सांगितले. महिला पूजेसाठी तयार झाली. दोन वर्षे बाबाने तिला औषधे दिली. परंतु, तिला काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे टिल्लू बाबाने तिच्या घरी पूजा करण्याचे ठरवले. अनेकदा पूजा करण्यात आली. प्रत्येक पूजेच्या वेळी दोघेही महिलेकडून ४० ते ५० हजार उकळत. अशाप्रकारे एकूण सात लाख रुपये उकळले. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच महिलेने पैसे परत मागितले असता टिल्लू बाबाने तिला भीती दाखवली. त्यामुळे महिलेने पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
अधिक वाचा : नोकरीचे आमिष दाखवून साडेअकरा लाखांनी फसवणूक