नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विविध विभागांमध्ये नागपूर विभाग सर्वोत्तम ठरला असून, उत्कृष्ट कामगिरीसह तब्बल १४ पुरस्कार या विभागाला प्राप्त झाले आहेत.
दपूमरेच्या बिलासपूर येथील मुख्यालयात रेल्वे सप्ताहानिमित्त आयोजित समारंभात दपूमरेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सोईन यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले. ‘ओव्हरऑल एफिशियन्सी’ पुरस्कार नागपूर विभागाच्या व्यवस्थापक शोभना बंडोपाध्याय यांनी स्वीकारला. याशिवाय नागपूर विभागातील अन्य अधिकाऱ्यांनीही हे पुरस्कार स्वीकारले. याप्रसंगी २० अधिकारी व १४१ कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. नागपूर विभागात वाणिज्य, कार्मिक, सिग्नल व दूरसंचार, यांत्रिक, विद्युत, आरोग्य, सुरक्षा, भांडार, लेखा, राजभाषा अशा विविध विभागांना यावेळी गौरविण्यात आले. विशेष म्हणजे देशातील रेल्वेच्या सर्व झोनमध्ये दक्षिण पूर्व मध्य रेल्वे हा सर्वाधिक उत्पन्न मिळविणारा झोन आहे. याही वर्षी दपमूरेने आपला उत्पन्नाचा विक्रम कायम ठेवला आहे, हे विशेष
यावेळी नागपूर विभागात पहिल्यांदाच शोभना बंडोपाध्याय यांच्या निमित्ताने महिला डीआरएम आहेत. त्यांच्या नेतृत्वात नगपूर विभागाने हे पुरस्कार मिळविले आहेत हे उल्लेखनीय.
अधिक वाचा : नागपूर-मुंबई दरम्यान उन्हाळ्यात २४ विशेष रेल्वेगाड्या