नागपूर : नागनदीचे सौंदर्यीकरण लवकरच करण्यात येणार असून फ्रान्स सरकारच्या एफडीकडून अर्थसहाय्य लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मोहम्मद इजारईल यांनी दिली.
बुधवारी (ता.१०) ला मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात एफडीने नागनदीच्या सौंदर्यीकरणसंदर्भात सादरीकरण केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त राजेश मोहिते, एनईएसएलचे संचालक डॉ. आर.झेड.सिद्दिकी, एफडीच्या सल्लागार सिबिका जॅकसिक, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, राजेश भूतकर, कार्यकारी अभियंता (वाहतूक) आसाराम बोदिले, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, राजू राहाटे, झोन सहायक आयुक्त सर्वश्री हरिश राऊत, प्रकाश वराडे, अशोक पाटील, सुभाष जयदेव, स्मिता काळे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार प्रामुख्याने उपस्थित होते.
नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी एएफडी अर्थसहाय्य करणार आहे. नागनदीचे प्रदूषण यामुळे नक्कीच कमी होईल आणि नदी स्वच्छ होईल, असा विश्वास सिबिका जॅकसिक यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी नागनदीच्या सौंदर्यीकरणाबाबत पीपीटीद्वारे सादरीकरण केले. यामध्ये नागनदीच्या काठावर पादचारी मार्ग तयार करणे व त्यावर आकर्षक विद्युत व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. नदीच्या सभोवताल ठिकठिकाणी कचरा टाकण्यासाठी कचरा पेटीची सोय करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला किमान पाच वर्ष लागणार असून या प्रकल्पाचा खर्च अंदाजे ८० ते १०० कोटी असा अपेक्षित असणार आहे. हा खर्च फ्रान्स सरकार करणार आहे. नागनदीच्या सभोवताल १५ मीटर ‘नो डेव्हल्पमेंट झोन’ असणार आहे. यामध्ये असलेल्या रहिवशांना किंवा संस्थांना याबाबत जागरुक करणेही अपेक्षित आहे, असेही सांगितले. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नक्कीच फायदेशीर ठरेल, यात काही शंका नाही, असे मो. ईजारईल यावेळी आभार व्यक्त करताना म्हणाले.
अधिक वाचा : मनपाच्या इतिहासात प्रथम विद्यार्थ्यांना स्वेटर : संदीप जोशी यांचा सत्कार