नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या रुग्णालयांनी अनेक पिढ्यांना उपचार देत नवजीवन दिले आहे. एकेकाळी खासगी रुग्णालयांची एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्धता नसताना मनपा रुग्णालयांनीच गरीब, मध्यमवर्गीय नागरिकांना संजीवनी देण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. अनेक आयुष्य वाचविणाऱ्या या रुग्णालयांची अवस्था आता वाईट असून या रुग्णालयांचेच जीवन वाचविण्याची वेळ आली आहे. इंदिरा गांधी रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेने पुढाकार घेतला असून या रुग्णालयात नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी अत्याधुनिक उपकरणे असणे आवश्यक आहे. या उपकरणासाठी राज्य शासनाकडून दोन कोटी रुपये देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जा व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने उत्तर अंबाझरी मार्गावरील इंदिरा गांधी रुग्णालयाच्या नूतनीकरण कामाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार, आमदार डॉ. परिणय फुके, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, नगरसेविका डॉ. परिणिता फुके, रुतिका मसराम, नगरसेवक अमर बागडे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख, आरोग्य उपसंचालक डॉ.के.बी. तुमाने, आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, केअरिंग इंडियाचे गुरमीत सिंग विज, डॉ. प्रवीण गंटावार, जयप्रकाश गुप्ता, रमेश गिरडे उपस्थित होते. यावेळी युरीनद्वारे कॅन्सरची तपासणी करणाऱ्या ‘कॅन किट’चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार यांच्यासह सर्व मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या किटद्वारे अवघ्या पाच मिनिटामध्ये कॅन्सरचे निदान होणार आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, प्राथमिक आरोग्य सेवा देण्यामध्ये मनपा रुग्णालयांचे महत्त्वाचे योगदान आहे. मात्र या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सुविधा असणेही आवश्यक आहे. परिसरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधेच्या दृष्टीने इंदिरा गांधी रुग्णालय सुरू करण्यात आले होते. या रुग्णालयातून पुढेही उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी नागपूर महानगरपालिकेने घेतलेल्या पुढाकाराला सहकार्य करीत शासनाकडून अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासंबंधीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, असा विश्वासही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
कॅन्सरमुळे दरवर्षी मोठ्या संख्येत नागरिकांचा मृत्यू होतो. यावर आळा घालण्यासाठी केअरिंग इंडियाने पुढाकार घेऊन ‘कॅन किट’ची निर्मिती केली. या किटमुळे अनेक लोकांचे जीवन वाचविता येणार आहे. राज्य सरकारच्या आयुष्यमान योजनेतून ५० कोटी नागरिकांचा विमा काढला जात आहे. याद्वारे अनेक मोठ्या आजारावर नि:शुल्क उपचार होणार आहे. या योजनेलाच ‘कॅन किट’ला जोडून कॅन्सरमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प असल्याचेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.
प्रसुतीसाठी महिलांना बाहेर जावे लागणार नाही : महापौर नंदा जिचकार
एकेकाळी मनपाच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नागरिकांची गर्दी असायची. आज रुग्णालयांची झालेली दुरवस्था सुधारण्यासाठी मनपाच्या वतीने पुढाकार घेण्यात येत आहे. शिवाय टाटा ट्रस्टच्या माध्यमातूनही रुग्णालयांचा कायापालट होत आहे. टाटाच्या सहकार्याने आतापर्यंत मनपा रुग्णालयातील १७ ओपीडी सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा प्रदान करण्यासाठी मनपा कटिबद्ध आहे. यासाठी आवश्यक तो निधीही पुरविण्यात येत आहे. मात्र नागरिकांची मनपाच्या रुग्णालयांच्या बाबतीत असलेली समजूत आज बदलण्याची गरज आहे. आज इंदिरा गांधी रुग्णालय परिसरातील महिलांना प्रसुतीसाठी बाहेर जावे लागते. मात्र आता मनपाच्या पुढाकाराने येथेच दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार असून महिलांना प्रसुतीसाठी इतर रुग्णालयांत धाव घ्यावी लागणार नाही, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी व्यक्त केला.
अधिक वाचा : थरार राष्ट्रगीताचा : हजारो नागपूरकर एकसाथ राष्ट्रगीताद्वारे पुन्हा घडवणार इतिहास!