प्रत्यक्ष भेट टाळा; तक्रारी, सूचना ऑनलाईन पद्धतीनेच करा! महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : ‘हॅलो महापौर’ ॲपचा वापर करा

Date:

नागपूर, ता. १७ : शहरातील नागरिक आपल्या तक्रारी आणि सूचना घेऊन महानगरपालिका कार्यालयात, महापौर कक्षात गर्दी करतात. सध्या शहरातील ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुढील काही दिवस नागरिकांनी सूचना आणि तक्रारींसाठी महापौर कार्यालयात न येता ऑनलाईन माध्यमांचा वापर करा. प्रत्यक्ष महापालिकेत येणे टाळा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ लागू करून खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नागपूर शहरात सी.आर.पी.सी.च्या कलम १४४ (निषेधाज्ञा) लागू करण्यात आली आहे. याअन्वये एका ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध आहे. तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, प्रदर्शनी शिबिर, सभा, संमेलने, धरणे, रॅली आदी पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित राहणार आहे.

नागपूर महानगरपालिका सरळ नागरिकांशी जुळलेली संस्था आहे. त्यामुळे साहाजिकच दररोज नागपूर महानगरपालिका मुख्यालय आणि झोन कार्यालयात नागरिकांची दररोज गर्दी असते. महापौर कार्यालयातही समस्या, तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्याही खूप असते. यापुढे आता नागरिकांनी आवश्यक कामांव्यतिरिक्त नागपूर महानगरपालिका कार्यालयात येणे टाळावे. महापौरांकडे जर तक्रार घेऊन येत असाल तर ती तक्रार ‘हॅलो महापौर’ या ॲपवर टाकावी किंवा ९७६४०००७८४ या क्रमांकावर वॉटस्‌ॲप करावी. तक्रार करताना आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक नमूद करावे. याव्यतिरिक्त जर महानगरपालिकेत आलात तर महापौर कार्यालयासमोर तक्रारी स्वीकारण्यासाठी तक्रार पेटी लागली आहे. त्यामध्ये नागरिकांनी आपल्या तक्रारी टाकाव्या. ॲप, वॉटस्‌ॲप, तक्रारपेटी आदी ठिकाणी आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाईल, अशी ग्वाही महापौर संदीप जोशी यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे आहे. कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही. मात्र खबरदारी आणि काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्व नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि कोरोनाला हद्दपार करण्यात सहकार्य करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related