पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अनारोग्य निर्माण करणारे, उघड्यावरचे पदार्थ खालल्याने जंतूसंसर्ग, ताप यासारख्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे या दिवसात काही पदार्थ टाळले पाहिजे.
- या दिवसात सॅलेड खाणं टाळावं.
- पावसाळ्यात वातावरणात ओलावा असल्याने हिरव्या पालेभाज्यांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होते. त्यामुळे पालेभाज्या टाळल्या पाहिजेत.
- कापल्यानंतर फळं लगेच खावीत. हवेशी संपर्क झाल्याने फळांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होते.
पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते. त्यामुळे तेलकट, तळकट पदार्थ खाऊ नयेत. - पावसाळ्यात भात खाल्ल्याने अंगावर सूज येण्यासोबतच पोट फुगतं. त्यामुळे भात प्रमाणात खावा.
- मीठामळे पोट फुगतं आणि भूक जास्त लागते. त्यामुळे या दिवसात मीठही कमीच खावं.
- पचनास जड असणार्या फ्लॉवर, कोबीसारख्या भाज्या खाऊ नयेत.
- दह्यामुळे कफ होतो.
- शीतपेयांमध्ये शरीरातल्या खनिजांचं प्रमाण कमी होऊन पचनक्रियेवर परिणाम होतो.
पावसाळ्यात काय खाल?
पावसाळ्यात आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल, तर काही खबरदाऱ्या घेणे क्रमप्राप्त आहे. खाण्याच्या चांगल्या सवयी आणि आरोग्यदायी पदार्थ तुम्हाला आजारांपासून लांब ठेवण्यात मदत करू शकतील.
भाजलेले मक्याचे कणीस –
पावसाळ्यात लिंबाचा रस पिळलेला आणि मीठ शिंपडलेला भुट्टा खायला कोणाला आवडत नाही! मका चविष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीदेखील लाभदायक आहे. मक्यामुळे मूत्रपिंड, पोट आणि हृदयाच्या समस्या उद्भवत नाहीत. मक्यात अनेक व्हिटॅमिन्स असल्याने ते पावसाळ्यात आवर्जून खावे. मका मूळतःच कोरडा असल्याने तो शरीरात पाणी साठून राहण्यास प्रतिबंध करतो. मक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्राव्य फायबर असल्याने तो पोटाच्या आरोग्यासाठीदेखील उपयुक्त ठरतो. मक्यात व्हिटॅमिन बी 6, थायमिन, नियासिन, फोलेट आणि रायबोफ्लेविन असल्याने तो बी व्हिटॅमिनचा चांगला स्रोत ठरतो. मक्यात अगदी थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ईदेखील असते.
गरमागरम रसम :
रसम म्हणजे आंबटगोड, झणझणीत असे दक्षिण भारतीय सूप. रसममुळे पोटामध्ये पाचक रस स्रवण्यात वाढ होते आणि ते पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनशक्तीकरिता लाभदायक ठरते. रसममधील टोमॅटो, चिंच, काळी मिरी, कडीपत्ता यामुळे रसम स्वादिष्ट आणि पोषक बनतो. रसममधील चिंच आणि टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असल्याने आपल्या शरीरात ऑक्सिडीकरणाने झालेले नुकसान भरून निघते. या घटकांमुळे कफ आणि थंडीला प्रतिबंध होतो. रसममधील काळ्या मिरीमुळे वजन कमी होण्यात मदत होते. काळ्या मिरीमुळे घाम सुटतो आणि घामावाटे शरीरातील अनेक विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकली जातात. काळ्या मिरीमुळे जास्तीत जास्त प्रमाणावर मूत्र तयार होते आणि चयापचयात वाढ होते.
आल्याचा चहा :
पावसाळ्यात आल्याचा चहा घेणे म्हणजे सुख असते. त्यात चवीकरिता मध किंवा लिंबूही टाकता येते. आल्याच्या चहामुळे भूक लागते आणि वाढतेदेखील. आल्यामुळे सांध्यांमधील आणि स्नायूंमधील काठिण्य व दाह कमी होत असल्याने आल्याचा चहा आर्थ्राटिसच्या रुग्णांकरिता अतिशय उपकारक ठरतो. कफ झाला असेल, थंडीताप असेल किंवा श्वसनाच्या समस्या असतील तर आल्याचा चहा गुणकारी ठरतो. सकाळी मळमळल्यासारखे होत असल्यास केव्हाही आल्याचा चहा घेणे उत्तम!