नागपूर : पैशाच्या वादातून पाच आरोपींनी एका युवकावर सळाख व लाकडी दंड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. मनोज रामाधर लिल्हारे (30, रा. बजरंग चौक, डिप्टी सिग्नल) असे जखमीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पिंटू लखन सेलोकर (30, रा. डिप्टी सिग्नल) आणि जखमी मनोज लिल्हारे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. एक वर्षापूर्वी मनोज लिल्हारे यांनी पिंटू सेलोकरला घराचे बांधकाम करून दिले. यात 50 हजार रुपये बांधकामाचे पिंटूकडून घेणे असल्याने मनोज यांनी पिंटूला पैशाची मागणी केली होती. गोपालनगर, एनआयटी क्वॉर्टरजवळ येथे त्यांनी पुन्हा पैशाची मागणी करता आरोपी पिंटू सेलोकरने चौघेही भाऊ असलेले साथीदार यांना फोन करून घटनास्थळी बोलाविले. त्यामुळे आरोपी विष्णू दयाराम बनपेला (45), शिव दयाराम बनपेला (40), शिवनाथ दयाराम बनपेला आणि गणेश दयाराम बनपेला (35) सर्व रा. डिप्टी सिग्नल, कळमना हे तत्काळ घटनास्थळी आले. त्यांनी पिंटूच्या सांगण्यावरून मनोजच्या डाव्या पायावर पाठीवर मारून गंभीर जखमी केले. या प्रकरणी मनोज लिल्हारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हे दाखल करून पिंटू सेलोकर याला अटक केली आहे.
अधिक वाचा : कारागृहातून सुटताच कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून हत्या