नागपूरचे महापौर संदीप जोशींवर गोळीबार; थोडक्यात बचावले

Mayor Sandip Joshi

नागपूर: नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. दोन अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी महापौरांच्या वाहनावर देशी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात महापौर जोशी थोडक्यात बचावले. या हल्लेखोरांनी महापौर जोशी यांच्यावर एकूण ४ गोळ्या झाडून ते पसार झाले. ही घटना अमरावती आउटर रिग रोडवर घडली असून हल्ल्याच्या वेळी महापौर स्वत: गाडी चालवत होते. नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना ही घटना घडल्याने नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महापौर संदीप जोशी यांनी काल वर्धा मार्गावर असलेल्या जामठा येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेजवळील रसरंजन धाब्यावर त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित कोला होता. हा कार्यक्रम आटोपून ते सुमारे १२ वाजण्याच्या सुमाराला आपले कुटुंबीय आणि मित्रांसह नागपूरला येत होते. त्यांच्यासोबत एकूण सात गाड्या होत्या,. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांच्या गाड्या त्यांच्या गाडीच्या पुढे होत्या. जोशी यांची फॉर्च्युनर ही गाडी सर्वांच्या मागे धावत होती. त्यांचा ताफा राष्ट्रीय कर्करोग संस्थेजवळ येताच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. हल्ल्यादरम्यान हल्लेखोरांनी एकूण ४ गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्यांच्या गाडीच्या काचा भेदून आत शिरल्या. मात्र सुदैवाने त्याना कोणतीही ईजा झाली नाही.

६ डिसेंबरला धमकावले होते

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना ६ डिसेंबर या दिवशी धमकावण्यात आले होते. जोशी यांनी नागपूर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरातील प्रमुख मार्ग आणि बाजार परिसरातील अतिक्रमण हटवण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी कारवाईही सुरू करण्यात आली होती. शिवाय नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेण्यासाठी नागपूर शहरात अनेक ठिकाणी १०० तक्रार बॉक्स लावण्यात आले होते. यातील एका बॉक्समध्ये संदीप जोशी यांना निनावी धमकीचे पत्र आले होते. या पत्रात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. जोशी यांनी याची तक्रारही दाखल केली होती.