परराज्यात जाणा-या रेल्वे प्रवाशांच्या भोजनाची मनपातर्फे व्यवस्था

लॉकडाउनमध्ये अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना घरी पोहोचविण्यासाठी केंद्र शासनातर्फे विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

arrangement-of-meals

नागपूर, ता. ६ : लॉकडाउनमध्ये अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना घरी पोहोचविण्यासाठी केंद्र शासनातर्फे विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याद्वारे मागील ४५ दिवसांपासून देशातील विविध भागात अडकलेले लोक स्वगृही पोहोचत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावरून जाणा-या अशा परराज्यातील नागरिकांच्या रेल्वेगाड्यांमध्ये नागरिकांची गैरसोय होउ नये, यासाठी मनपातर्फे त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. बुधवारी (ता.६) नागपूरवरून बिहार मुजफ्फरपूरकडे निघालेल्या रेल्वेतील सुमारे एक हजारावर प्रवाशांना मनपातर्फे भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.

शहरातील बेघर, निराधांनासह गरजूंची मनपातर्फे भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र अनेक तासांचा प्रवास करून घरी परत जाणा-या रेल्वे प्रवाशांचीही जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम यांच्या नेतृत्वात कार्य करण्यात येत आहे. मनपा आयुक्तांच्या पुढाकाराने परराज्यातील नागरिकांना स्वगृही पोहोचविणा-या नागपूर रेल्वेस्थानकावरून जाणा-या प्रत्येकच रेल्वेगाडीमधील प्रवाशांची मनपाच्या माध्यमातून भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. या कार्यासाठीही शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी नागरिकांची साथ मिळाली आहे. शहरातील मैत्री परिवार, लॉयन्स क्लब, मॉ फाउंडेशन, राजमुद्रा फाउंडेशन, दिलीप चिंचमलातपुरे या सर्वांच्या सहकार्याने मनपाद्वारे एक हजारावर प्रवाशांना पुरी भाजी, केळी, पाण्याची बॉटल, ग्लुकोज बिस्कीट, लोणचे आदी सर्व वितरीत करण्यात येत आहे.

लॉकडाउनमध्ये शहरात कुणीही उपाशी राहू नये यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने दररोज ५० हजारावर जेवणाचे पॅकेट्स गरजूंपर्यंत पोहोचविण्यात येतात. शहरातीलच नव्हे तर आपल्या शहरातून जाणारी कोणतिही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठीही मनपा कार्य करीत आहे. त्याच संकल्पनेतून परप्रांतीय नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. शहरातील रेल्वे स्थानकावरून दररोज ४ ते ५ रेल्वेगाड्या जातात या सर्व गाड्यांमधील प्रवाशांपर्यंत स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी नागरिकांच्या मदतीने मनपा जेवण पोहोचविण्याचे कार्य करीत आहे.

प्रत्येकाने आपल्या घरी सुखरूप पोहोचावे, त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होउ नये याची काळजीही घेतली जात आहे. बुधवारी (ता.६) शहरात अडकलेल्या उस्मानाबाद येथील ३९ नागरिकांनाही रेल्वेने त्यांच्या स्वगृही बिहारला पोहोचविण्याची व्यवस्था मनपा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आली. यासंबंधी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने मनपाशी संपर्क साधण्यात आला होता व तेथील प्रवाशांना स्वगृही पाठविण्याची विनंती करण्यात आली होती. बुधवारी रामटेक, कळमेश्वर, नरखेड, काटोल, उमरेड, सावनेर, नागपूर ग्रामीण, कुही, मौदा, हिंगणा, भिवापूर, कामठी, नागपूर शहरातील बेघर निवारा केंद्र आणि उस्मानाबाद येथील सुमारे एक हजार नागरिक मनपाच्या प्रयत्नामुळे स्वगृही पोहोचणार आहेत.

Also Read- स्वगृही परतणा-यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी दहाही झोनमध्ये व्यवस्था; नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी टोकन प्रणाली लागू