नागपूर : एरोनॉटिकल इंजिनीअरिंगच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बेसा मार्गावरील साईलीला एन्क्लेव्ह अपार्टमेंटमध्ये शनिवारी रात्री उघडकीस आली. अंकित नरेश गोनाडे, असे मृताचे नाव आहे. तो पुण्यातील कॉलेजमध्ये एरोनॉटिकलच्या अभ्यासक्रमाला होता. प्रशिक्षणासाठी तो मुंबई येथे गेला होता.
मात्र, आजारी झाल्याने २६ डिसेंबरला तो नागपुरात परतला. शनिवारी रात्री त्याचे आई-वडील व दोन बहिणी नातेवाइकांकडे कार्यक्रमासाठी गेल्या. घरी तो एकटा होता. यादरम्यान त्याने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. नातेवाइक घरी परतले असता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वरचे पोलिस उपनिरीक्षक व्ही. आर. वडोदे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. त्याला काविळ झाला होता. या आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
अधिक वाचा : नागपुरात थर्टी फर्स्टसाठी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त



