नागपूर : शहरातील वास्तुशास्त्रीय दृष्ट्या जतन करावयाच्या पुरातन वास्तु किंवा परिसरासंदर्भात गठीत हेरिटेज संवर्धन समिती बैठकीमध्ये विविध विषयांना मंजुरी प्रदान करण्यात आली. शनिवारी (ता. १७) महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील नगर रचना विभागाच्या सभागृहात हेरिटेज संवर्धन समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीला समितीचे अध्यक्ष नीरीचे संचालक डॉ. तपन चक्रवर्ती, समिती सदस्य वास्तुविशारद अशोक मोखा, नागपूर वस्तु संग्रहालयाचे क्युरेटर विराग सोनटक्के, डॉ. शुभा जोहरी, प्रा. निता लांबे, सहायक संचालक (नगर रचना) प्रमोद गावंडे, नगर रचनाकार पी.पी. सोनारे आदी उपस्थित होते.
माजी खासदार ॲड. प्रकाश आंबेडकर प्रणीत वंचित बहुजन आघाडीतर्फे कस्तुरचंद पार्क येथे १२ डिसेंबरला जाहीर सभेच्या आयोजना संदर्भात भारिप बहुजन महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव सागर डबरासे यांनी अर्ज सादर केले. या अर्जाची दखल घेत सभेच्या आयोजनाला समितीच्यावतीने मंजुरी देण्यात आली. याशिवाय मेडीकल चौकातील राजाबक्षा देवस्थान हनुमान मंदिरापुढील मैदान परिसरातील विकास कामांसंदर्भात समितीपुढे प्रस्ताव सादर करण्यात आला. सदर ठिकाणी समितीतर्फे प्रत्यक्ष भेट देउन पाहणी केल्यानंतर संबंधित कामांच्या मंजुरीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले.
सीताबर्डी येथील झिरो माईल स्टोनच्या संवर्धनाकरिता दी हेरिटेज कन्झर्व्हेशन सोसायटीच्या सचिव लिना झिल्पे यांच्या वतीने अर्ज सादर करण्यात आला. यासंदर्भात नागपूर मेट्रोला आधीच परवानगी देण्यात आली असल्याचे समितीच्यावतीने सांगण्यात आले. नागपूर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनच्यावतीने ११ ते १६ जानेवारी २०१९ दरम्यान कस्तुरचंद पार्क येथे राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या आयोनासाठी असोसिएशनतर्फे समितीकडे अर्ज सादर करण्यात आला. या स्पर्धेसाठी समितीच्या वतीने मंजुरी प्रदान करण्यात आली.
अधिक वाचा : आता मनपाला मिळणार वर्षाकाठी १०३८ कोटी जीएसटी अनुदान