नागपूर : महापालिकेने मालमत्ता कर विभागाच्या उत्पन्नात वाढ व्हावी, म्हणून शहरातील मालमत्ताचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये दीड लाखापेक्षा अधिक मालमत्ता वाढल्याचे निदर्शनात आले आहे. मात्र, वसुलीत अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीसाठी मनपा आता खासगी कंपनीची नियुक्ती करणार आहे.
मार्चपूर्वी मालमत्ता कर वसुलीची शक्यता फार कमी आहे, त्यामुळे या समस्येवर कायमस्वरुपी पर्याय म्हणून कर वसुलीसाठी महापालिका खासगी कंपनीची मदत घेणार आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. खासगी कंपनीला मालमत्ता कर वसुलीच्या टक्केवारीच्या आधारावर कमिशन देण्यात येणार आहे. मात्र, खासगी कंपनीने ७५ टक्क्यापेक्षा अधिक वसुली केली तर कमिशनच्या टक्केवारीमध्ये देखील वाढ होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.
आर्थिक वर्ष मार्च २०१९ ला संपत असल्याने या वर्षातील वसुली एजन्सीकडे देणे शक्य नाही, त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०१९ पासून खासगी एजन्सीकडे मालमत्ता कर वसुलीची जबाबदारी देण्याचा प्रस्ताव आहे. महापालिकेचे स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी यावृत्ताला दुजोरा दिला आहे.
अधिक वाचा : ग्रीन बस पुन्हा सुरू होणार; स्कॅनियाकडून हिरवी झेंडीची प्रतीक्षा