कळमेश्वर : नागपूर महापालिकेअंतर्गत सुरू असलेल्या नागपूर-कळमेश्वर या मार्गावर स्टारबस चालकांच्या निष्काळजीपणाने आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. यातच मंगळवारी (ता. ५) स्टारबसने झालेल्या अपघातात आई व मुलगा जागीच ठार झाला. यात पंकज गजभिये (वय अंदाजे ३०) व सरस्वती गजभिये (वय ५०, नागपूर) हे दोघे जागीच ठार झाल्याची घटना दुपारी एकच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, पंकज व त्याची आई सरस्वती हे दोघे नागपूरवरून काही खासगी कामानिमित्त दुचाकीने कळमेश्वर येथे येत होते. कळमेश्वरवरून नागपूर येथे जात असलेल्या स्टारबसने (क्र.एमएच३१सीए ६१६०) फेटरी या गावाजवळ असलेल्या हनुमान मंदिरासमोर दुचाकी वाहनास समोरासमोर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार आई व मुलगा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली.
मृत पंकज याचा मित्र योगेश शिंदे हा घटनास्थळी दाखल झाला व उपचारार्थ त्यांनी नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात आई व मुलाला दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनात पोलिस सहनिरीक्षक विवेक सोनोने करीत आहेत.
अधिक वाचा : कामठी येथून ४६ किलो गांजा जप्त, तिघांना अटक