नागपूर : पोलीस विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे ‘अॅन्टी हायजॅक मॉक एक्सरसाईज’ प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली, सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम उपस्थित होते. ही मॉकड्रील प्रात्यक्षिकामध्ये हैद्राबाद ते चेन्नई जाणारे विमान हे दहशतवाद्यांनी अपहरण केले असून ते नागपूर विमानतळावर उतरविणार आहेत, अशी माहीती मिळाल्यामुळे आपत्कालीन योजनेनुसार विमानतळावरील विमान सुरक्षिततेकरीता असणाऱ्या सर्व एजन्सींना त्याबाबत कळविण्यात आले.
अपहरण केलेले विमान नागपूर विमानतळावर उतरताच दहशतवाद्यांनी पैसे, इंधन आणि त्यांचे तुरूंगात बंद असलेले साथीदार यांना तात्काळ सोडण्याबाबत हिंदुस्थान सरकारकडे मागण्या केल्या. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास विमानातील प्रवाशांना ठार मारण्याची धमकी सुध्दा दिली. त्यामुळे विमानतळ सुरक्षेसाठी असणाऱ्या सीआयएसएफचे सर्व सुरक्षा रक्षक, कमांडो यांनी विमानतळाचे आतील आणि बाहेरील बाजुची सुरक्षा यंत्रणा कडक केली. या विमान अपहरणाबाबत शहर पोलीस नियंत्रण कक्षाला माहीती मिळताच नियंत्रण कक्षाकडील जलद प्रतिसाद पथक, बीडीडीएस, फायर ब्रिगेड, अॅम्बुलन्स, व स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना शहर वाहतूक शाखेने ग्रीन कॉरीडोअर तयार केल्यानमुळे ते तात्काळ विमानतळावर दाखल झाले.
आपत्कालीन परिस्थितीतील योजनेनुसार प्रात्यक्षिकाची आपापली जबाबदारी सांभाळली. विमानतळ सुरक्षितेकरीता असलेले सीआयएसएफ, क्युआरटी व नागपूर शहर पोलीस क्युआरटी यांनी आपसात समन्वय साधून संयुक्तरित्या योजना आखून आपापल्या टिममधील उत्कृष्ठ कमांडो, यांना विमानातील प्रवाशांच्या सुरक्षीत सुटकेकरीता पाठविण्यात आले. दहशतवादी आपल्या मागण्याकरीता हिंदुस्थान सरकारवर दबाव टाकत होते. त्यावेळी वरीष्ठ अधिकारी त्यांना बोलण्यात गुंतविण्याचा प्रयत्न करीत होते. त्या दरम्यान सी.आय.एस.एफ.ची क्यु.आर.टी. व नागपूर शहर पोलिसांची क्युआरटी यांनी विमानतळाच्या पाठीमागील दरवाजाने आत प्रवेश केला. दहशतवाद्यांनी विमानातील दोन प्रवाशांना जखमी केल्याने त्यांना घेण्यासाठी एक अॅम्बुलन्स आतमध्ये पाठविली. त्यामध्ये साध्या वेशातील कमांडोंना पाठविण्यात आले. त्यांनी दहशवाद्यांची नजर चुकवून विमानात आत प्रवेश करून त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यामध्ये तीन दहशवादी ठार झाले. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आले. विमानातील जखमी प्रवाशांना तात्काळ अॅम्बुलन्सने ऑरेंज सिटी हॉस्पीटल येथे उपचाराकरीता भरती करण्यात आले. सुमारे ४ तास हे मॉकड्रील सुरू होते.
अधिक वाचा : नागपुर में मिलिट्री स्पेशल ट्रेन के डिब्बे पटरी से उतरे