नागपूर : तब्ब्ल पावणे दोन वर्षानंतर नागपूर (विदर्भ) जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या वर्ग एक ते चौथीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोना विषाणूच्या भीतीनं शाळा बंद होत्या. विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी उत्सूक होते. ती संधी शेवटी विद्यार्थ्यांना मिळाली. खरबी येथील शाळेत विद्यार्थ्यांचे हात सॅनिटाईज करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. वर्गात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था नियमानुसार करण्यात आली हाेती. विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
घरी असलेल्या मुलांना सांभाळणे खूप कठीण काम होते. आता ते शाळेत जाणार असल्यानं तेवढा उसंत मिळेल, असं मत एका पालकानं व्यक्त केलं. मुलं घरी होती. तेव्हा त्यांच्याकडं प्रत्येकवेळी लक्ष द्याव लागायचं. मोबाईलचा वापर आता जरा कमी होईल, अशी अपेक्षाही पालकांनी व्यक्त केली.
शाळेच्या पहिल्याच दिवशी बहुतेक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी फूल देऊन शाळेत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. काही शिक्षकांनी टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न केला.
आजपासून नागपूर (विदर्भ) जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. शहरातील शाळा मात्र १० डिसेंबरनंतरच सुरू होतील. ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार असल्यानं शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आंनदाचे वातावरण आहे.
गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद होत्या. ऑनलाइन शिक्षण काही शाळांमध्ये सुरू होतं. मात्र, ग्रामीण भागातील अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना शिक्षण घेत येत नव्हतं. अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळं शाळा सुरू झाल्याने त्यांना शिक्षणाचे धडे गिरवता येणार आहेत. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होत असल्यानं शाळा प्रशासनाला पूर्णपणे खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.