मुख्यमंत्र्यांचे विरोधक असलेले अॅड. सतीश उकें यांना जमिनीच्या वादातून अटक

सतीश उके

नागपुर :- मुख्यमंत्र्यांचे विरोधक म्हणून संत्रानगरीत परिचित असलेले आणि शहरातील बहुचर्चित वकील सतीश उके यांना मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली आहे. जमिनीशी संबंधित फसवणूक प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. शोभाराणी राजेंद्र नाकाडे यांनी गेल्या वर्षी अजनी पोलिसांकडे जमिनीशी संबंधित फसवणूक प्रकरणाची उके विरोधात तक्रार दाखल केली होती.

मागील काळात अॅड. उके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या. नाकाडे यांच्या जमिनीच्या वादाचे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले होते. त्यानंतर उके यांना बनावट कागदपत्राद्वारे जमीन विकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

माहिती नुसार जमिनीच्या वादाचे हे प्रकरण १७ वर्षांपूर्वीचे आहे. नाकाडे यांच्याकडून ही जमीन १९९१ मध्ये ऐश्वर्य गृहनिर्माण सोसायटीला ही जमीन विकण्यात आली होती. १० वर्षांनंतर अ‍ॅड. उके यांनी पॉवर आॅफ अटर्नी चा वापर करत बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर ही जमीन त्यांनी दुसऱ्यांना विकून टाकली,असा त्यांचावर आरोप आहे. या प्रकरणाला १७ वर्षे झाली असताना वर्षभरापूर्वी त्याची तक्रार नाकाडे यांनी केली. त्यानुसार, मंगळवारी या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलिसांनी उके यांना अटक केली.

या जमिनीची किंमत अंदाजे ५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात पोलिसांनी अ‍ॅड. उके यांच्यासह त्यांचा भाऊ प्रदीप महादेवराव उके आणि चंद्रशेखर नामदेवराव मते यांनाही आरोपी बनविले आहे. या तिघांनी संगनमत करून जमिनीच्या सातबारावर नोंद असलेल्या मालकाला रीतसर नोटीस न देता अथवा संपर्क न करता सोसायटीची दीड एकर जमीन बळकावल्याचा आरोप आहे.