नागपूर – अट्टल दारूडा दारूचा शौक पूर्ण करण्यासाठी घरची भांडीकुंडी विकतो. त्याप्रमाणे केंद्र सरकार उत्पन्नासाठी देशातील नवरत्न कंपन्या विकायला निघाले असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केंद्र सरकारवर केली.
आंंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा समाचार घेतला. सरकारने २४ लाख कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे मागील अर्थसंकल्पात जाहीर केले होते. सरकार आता नवरत्न कंपन्या विकायला निघाले आहे. दारूड्याने दारूची नशा भागवण्यासाठी भांडीकुंडी विकण्यासारखा हा प्रकार आहे. या कंपन्या सोन्यांची अंडी देणारी कोंबडी आहे. सरकार कोंबडीच विकायला निघाले आहे, असे ते म्हणाले.
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि आर्थिक धोरणांच्या विरोधातच २४ जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडी आणि इतर २५ संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली असल्याचे सांगून आंबेडकर म्हणाले की, बंद पूर्णपणे शांततेने राहणार आहे. लोकांनी तो स्वयंस्फूर्तीने पाळावा, असे आमचे प्रयत्न आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या माध्यमातून केंद्रातील भाजप सरकारला त्यांचे काही वाईट हेतू साध्य करायचे आहेत. त्यामुळेच तो देशभर लागू करण्याचा घाट घातला जात आहे. त्याच्या जोडीला सर्वसाधारण जनगणनेऐवजी नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरची टूम काढण्यात आली. एस.सी. आणि एस.टी. वगळता इतर जातींचा उल्लेख येणार नाही, अशी व्यवस्था केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या प्रयत्नांना विरोध होऊ नये म्हणून देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत करणारे नोटबंदी, जीएसटीसारखे निर्णय घेतल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला. एनआरसीवर सर्व राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे आंदोलन केले पाहिजे. एनआरसीला विरोध असलेल्या राज्यांनी संयुक्त भूमिका मांडली असती तर ती अधिक प्रभावी ठरली असती, असेही ते म्हणाले.
इंदू मिलमधील आंबेडकर पुतळ्याचा निधी वाडिया रुग्णालयावर खर्च करावा, या मतावर ठाम असल्याचे सांगताना आंबेडकर म्हणाले की, या मतावरून आपल्यावर होत असलेल्या टीकेची पर्वा नाही. पुतळ्यांपेक्षा जिवंत माणूस महत्त्वाचा, अशी बाबासाहेबांची शिकवण होती. त्यामुळे निधी मुलांच्या रुग्णालयावर खर्च होणार असेल तर चांगलेच आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीवर आंबेडकर म्हणाले, सावरकर क्रांतिकारक होते हे मान्यच, पण त्यांचा क्रांतीच्या विरोधाचा दुसरा चेहराही होता. त्यामुळे भारतरत्नच्या विषयावर देशात चर्चा व्हायला हवी.