मुंबई : 2016मध्ये रिलीज झालेल्या ‘सैराट’ या मराठी चित्रपटाने अफाट प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाने प्रेक्षकांवर अक्षरशः जादू केली होती. चित्रपटातील प्रत्येक पात्र अजरामर झाले. या चित्रपटातील ‘आर्ची’ अर्थात मुख्य नायिका रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हिला या चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातून अभिनेत्रीने असे नाव कमावले की, आजही तिला या चित्रपटासाठी विशेष ओळखले जाते. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आर्ची आणि परश्या या जोडीने सर्वांच्या हृदयावर राज्य केले. रिंकू राजगुरूने सिनेमाच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. इतकेच नाही तर अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने सर्वांच्या हृदयात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. आता रिंकू राजगुरू आणखी एक मोठी झेप घेत आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरू नेटफ्लिक्सच्या आगामी ‘अनकही कहानिया’ (Ankahi Kahaniya) या चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच तिच्या या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
View this post on Instagram
नेटफ्लिक्सचा नवा चित्रपट
नेटफ्लिक्सच्या या चित्रपटामध्ये प्रेमाच्या तीन वेगवेगळ्या कथा प्रेक्षकांना पाहायला मिळतील. यातील एका कथेत रिंकू राजगुरु झळकणार आहे. अश्विनी तिवारी, अभिषेक चौबे, साकेत चौधरी यांनी या चित्रपटातील कथांसाठी दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू सोबतच या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, झोया हुसेन, कुणाल कपूर, पालोमी, देलझाद हिवले हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. रिंकू राजगुरू हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याची माहिती शेअर केली आहे. रिंकू या पोस्टमध्ये लिहीते की, “या मोठ्या शहरात प्रेम मिळणं सोपी गोष्ट नाही. अश्याच प्रेमाची अनकही कहानिया लवकरच नेटफ्लिक्सवर 17 सप्टेंबरला येत आहे.”
‘200 हल्ला हो’मध्ये झळकणार मुख्य भूमिकेत!
ZEE5ने गुरुवारी आपला आगामी चित्रपट ‘200 – हल्ला हो’चा ट्रेलर रिलीज केला. 200 Halla Ho हा एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे, ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, अभिनेता बरुण सोबती आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सार्थक दासगुप्ता यांनी केले आहे. व्हर्च्युअल कार्यक्रमात या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ‘200 हल्ला हो’ हा एक अतिशय गंभीर समस्येवर भाष्य करणारा चित्रपट आहे. ही घटना कित्येक वर्षांपूर्वी घडली होती, जेव्हा 200 दलित महिलांनी एकत्रितपणे कायदा आणि न्याय हातात घेतला होता. या चित्रपटात ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
कशी आहे रिंकूची भूमिका?
या चित्रपटातील भूमिकेविषयी सांगताना रिंकू म्हणाली की, ‘ही एक अशी मुलगी आहे, जी स्वतः एका दलित कुटुंबातून पुढे आली आहे. तिने वर्षानुवर्षे स्त्रियांवर होणारा अत्याचार पाहिला आहे. इतका अत्याचार सहन करूनही या स्त्रीया गप्प का बसतात, असा प्रश्न तिला नेहमीच पडत असतो. आता ही मुलगी स्वतःच्या पायांवर उभी राहिली आहे. इतकंच नाही तर या स्त्रियांच्या आणि आपल्या हक्कासाठी जोरदार लढा देणार आहे, अशी लढाऊ आशा साकारताना मला देखील खूप छान वाटलं.’