वर्धा 13 फेब्रुवारी : हिंगणघाटमधल्या जळीत प्रकरणाने सर्व राज्य हादरून गेलं होतं. मृत्यूशी झुंझ देणाऱ्या त्या पीडितेची लढाई सात दिवसानंतर संपली होती. नागपुरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करूनही ती वाचू शकली नाही. या प्रकरणातला आरोपी विकेश नगराळे हा सध्या तुरुंगात आहे. त्याला या घटनेची माहिती जेव्हा पोलिसांनी दिली तेव्हा त्याचा चेहेरा निर्विकार होता अशी माहिती समोर आलीय. त्यानंतर पोलिसांजवळ तो बोलताना त्याने प्रतिक्रिया दिली की, माझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास होत असेल तर मला गोळ्या घालून मारून टाका असं तो म्हणाल्याची माहिती समोर आलीय.
विकेशनेच हिंगणघाटमधल्या एका चौकात पीडित प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळलं होतं. त्यात ती 40 टक्के जळाली होती. या प्रकरणावर सर्व देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या प्रकरणाचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. प्रसिद्ध वकिल उज्ज्वल निकम हे सरकारतर्फे पीडितेची बाजू मांडणार असून आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
आरोपीला सकाळी 6 वाजताच केलं कोर्टात हजर
हिंगणघाट जळीत प्रकरणातला आरोपी आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्याच्या विरुद्ध नागरीक आक्रमक असल्याने त्याला पहाटे 6 वाजताच न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. सकाळी पहाटेदरम्यान न्यायाधीश रत्नमाला डफरे यांच्या न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी गुप्तता पाळत हजर केलं.
एमसीआर देत आरोपीची जेलमध्ये रवानगी झाल्याची माहिती आहे. पोलीस याबाबत गमालीची गुप्तता पाळत आहेत. पीडितेवर नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते . तज्ज्ञ डॉक्टरांची टीम प्रयत्नांची शर्थ करत असली तरी पीडितेची प्रकृती सातही चिंताजनकच होती. एका तरुणाने प्राध्यापक असलेल्या पीडितेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ती 40 टक्के भाजली होती. त्यानंतर तातडीने तिला नागपूरला हलविण्यात आलं होतं. पेट्रोलच्या धुरामुळे तिच्या श्वसन नलिकेत धुर गेला आणि ती भाजली गेली.